वाशी : अनधिकृत बांधकाम विरोधात महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार धडक कारवाई करण्यात येत असून आज अतिक्रमण विभागाने वाशी रेल्वे स्टेशनजवळील बीएसईएल टेक पार्कमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला.
याठिकाणी चौथ्या मजल्यावरील शिपींग कंपनीमार्फत मार्जिनल स्पेसचा वाणिज्य वापर केला जात होता. साधारणत: 10 x 25 फूटाची ही जागा आज कारवाई करून वापरासाठी खुली करण्यात आली. त्याचप्रमाणे अकराव्या व बाराव्या मजल्यावरील मार्जिनल स्पेसमधील बांधकाम वापर करणा-यांनी महापालिकेने कारवाई करण्यापूर्वीच स्वत:हूनच निष्कासीत केले. महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार महापालिका करीत असलेली अतिक्रमण विरोधी धडक कारवाई बघून अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर अनेक नागरिक स्वत:हूनच आपली अनधिकृत बांधकामे निष्कासीत करताना दिसत आहेत.
याच इमारतीत तळमजल्यावर असलेल्या वसुंधरा हॉटेल व रूठ हॉटेलमार्फत बेसमेंट मधील पार्कींगच्या जागेत दोन केबिन्स तसेच किचन बनविण्यात आले होते. त्यावरही धडक कारवाई करीत ती जागा खुली करण्यात आली तसेच त्या जागेचा वापर पार्कींगसाठीच करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या,
महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, उपआयुक्त सुभाष इंगळे, सहा. आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्या निरीक्षणाखाली महापालिका व पोलीस अधिकारी – कर्मचारी यांच्या वतीने ही धडक कारवाई करण्यात आली.