नवी मुंबई : नागरी सुविधांचा दर्जा राखतानाच जनतेला विहित वेळेत योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्या करताना अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयीन शिस्तीचे पालन करावे यादृष्टीने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष लक्ष दिले आहे. या अनुषंगाने कामात हलगर्जीपणा करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असून नगररचना विभागातील शाखा अभियंता कैलास गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
इनॉर्बिट मॉल, वाशी येथील वाहनतळासाठी बेकायदेशीर शुल्क आकारणीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीकडे शाखा अभियंता कैलास गायकवाड यांनी दुर्लक्ष करुन पुढील कार्यवाही न केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 नुसार बेकायदिशीररित्या पार्कींग शुल्काबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून मॉल चालकांविरोधात कारवाई करत नसल्याची लक्षवेधी सूचना प्राप्त झालेली आहे.तसेच से.19 डी, वाशी येथील भूखंड क्र. 3 व 4 वरील इमारतीचे काम अपूर्ण असूनही भोगवटा प्रमाणपत्रासाठी त्यांचेकडून चुकीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे.
अशाप्रकारे शाखा अभियंता कैलाश गायकवाड यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येऊन त्यांना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचेकडे सोपविलेले काम योग्य प्रकारे व विहित वेळेत करावे या भूमिकेतून अशाप्रकारची कार्यवाही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.