नवी मुंबई: कारच्या काचा फोडून कारमधील किंमती ऐवज चोरणार्या चोरट्यांनी खारघर सेक्टर-२० मधील शहा किंगडम समोर उभ्या असलेल्या तीन कारच्या काचा फोडून त्या कारमधील हजारो रुपये किंमतीचा ऐवज तसेच महत्वाची कागदपत्रे चोरी केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. विशेष म्हणजे सदर चोरी अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये झाली आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
खारघर सेक्टर- ३५ मध्ये राहणारे सवैशर शर्मा १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास खारघर सेक्टर-२० मध्ये कामानिमित्त कारच्या काचा फोडून चोरी गेले होते. यावेळी त्यांनी आपली कार शहा किंगडम समोर उभी केली होती. यावेळी शर्मा यांनी त्यांच्याजवळील वस्तु, रोख रक्कम कारमध्ये ठेवून ते समोरच्या ईमारतीत गेले. शर्मा यांच्याप्रमाणेच रोशन नाईक
आणि हिरानंद मुलचंद तोरानी या दोघांनी सुध्दा शर्मा यांच्या प्रमाणेच शहा किंगडम समोरील रस्त्यावर आपली कार पार्क केली होती. त्यानंतर ते देखील
तेथील दुकानात गेले. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शर्मा यांच्यासह इतर दोघांच्या कारच्या काचा फोडून कारमधील रोख रक्कम, दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, क्रेडीट कार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रे असा हजारो रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान अर्ध्या तासानंतर शर्मा आणि इतर कार मालक कार जवळ आल्यावर तिन्ही कारच्या काचा फोडून कारमधील सर्व किंमती ऐवज चोरुन गेल्याचे आढळून आले. त्यामुळे शर्मा आणि इतर कार मालकांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी अज्ञान चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.