१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त आमदार नरेंद्र पवारांचा अनोखा कार्यक्रम
कल्याण : आपल्या जीवाची बाजी लावून भारत भूमीच्या संरक्षणासाठी शत्रूशी दोन हात करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्यचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या याच सैनिकांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी साहसी खेळातून अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी सायंकाळी ४.०० वाजता खडकपाडा वसंत व्हॅली या ठिकाणी करण्यात आले आहे. उंच इमारती अगदी शिताफीने चढणारे इंडियन स्पायडरमॅन गौरव शर्मा वसंत व्हॅली येथील आर & सी हि तब्बल १९ मजल्याची इमारत चढणार असून भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार हीच इमारत रेपलिंग या साहसी खेळाच्या माध्यमातून उतरण्याचे प्रात्यक्षिक करणार आहे. या साहसी खेळातून भारत भूमीच्या संरक्षणासाठी अहोरात्र तत्पर असलेल्या भारतीय सैनिकांना अनोखी मानवंदना देऊन आपला राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. हा साहसी खेळाचा थरार पाहण्यासाठी आणि भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी कल्याणकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार नरेंद्र पवार यांच्यामाध्यमातून इंडियन स्पायडरमॅन गौरव शर्मा यांनी शनिवारी कल्याण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
आपले भारतीय सैन्य म्हणजे शौर्य आणि अतुलनीय साहसाचे प्रतिक आहे. शत्रुराष्ट्राबरोबर युद्धाचा प्रसंग असो वा एखाद्या आपत्कालीन स्थितीत सर्व सामान्य नागरिकांना मदतीचा प्रसंग,आपल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे अनेक पराक्रम आपले सैनिकी नेहमीच करत असतात. आपल्या सैन्यातील सैन्यातील साहसी वृत्ती पाहून आबालवृद्धांसह तरुण देखील नेहमीच प्रोत्साहित होतात. या साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी, तरुणांमध्ये योग्य साहसाबद्दल आकर्षण वाढण्यासाठी आणि यापासून प्रेरित होऊन जास्तीतजास्त तरुणांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या १५ ऑगस्ट ला, भारताच्या स्वातंत्र्यदिनी करण्यात आली असल्याची माहिती इंडियन स्पायडरमॅन गौरव शर्मा यांनी दिली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले कि रेपलिंग हा एक साहसी क्रीडा प्रकार – कुठलीही बिल्डींग असो व अवघड चढाई, ती लीलया चढणे आणि उतरणे हि इंडियन स्पायडरमॅन गौरव शर्मा याची खासियत आहे. येत्या १५ ऑगस्ट ला इंडियन स्पायडरमॅन गौरव शर्मा आपल्या कल्याण मध्ये येणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी तो कल्याण मधील वसंत व्हॅली येथील आर & सी हि तब्बल १९ मजल्याची हि इमारत सायंकाळी ४.०० वाजता चढून रेपलिंग हा साहसी क्रीडा प्रकार पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या कल्याणकरांना देणार आहेत. त्याच्या बरोबर आमदार नरेंद्र पवार हि रेपलिंग करत संपूर्ण ईमारत उतरणार आहे. यामाध्यमातून महाराष्ट्रात प्रथमच एका अनोख्या पद्धतीने सैनिकांना मानवंदना देण्याचा विक्रम आमदार नरेंद्र पवार नोंदवणार आहेत.
दम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश एवढाच आहे कि आजच्या या “फेसबुक” आणि “पोकेमोन गो” च्या जमान्यात जास्तीत जास्त तरुण विविध खेळांकडे आकर्षित व्हावेत. तरुणांमध्ये साहसी वृत्ती जागी होऊन, जास्तीत जास्त तरुण भारतीय सैन्यात सामील व्हावेत. सर्वसामान्य नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी एकत्र येउन भारतीय सैन्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी तसेच जगातील सर्वात जास्त तरुण असणाऱ्या आपल्या भारत देशातील तरुणाईच्या क्रयशक्तीचा उपयोग आपला भारत देशाच्या प्रगतीसाठी व्हावा या हेतूनेच हा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे इंडियन स्पायडरमॅन गौरव शर्मा यांनी स्पष्ट केले. या साहसी खेळाचे सक्षीदार होण्यासाठी तमाम कल्याणकरांनी या अनोख्या मानवंदना कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी इंडियन स्पायडरमॅन गौरव शर्मा यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला भाजपाचे ठाणे जिल्हा विभागीय सरचिटणीस राजाभाऊ पातकर, संजय वझे देखील उपस्थित होते.