नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे अपंग व्यक्तींना समर्थ बनविणारे केंद्र म्हणून नावाजले जात असून या लोककल्याणकारी कार्याबद्दल यापूर्वी अनेक पुरस्कारांनी गौरविले गेलेले आहे. यामध्ये आणखी एका मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने इ.टी.सी. केंद्रास भारतीय गुणवत्ता परिषद अर्थात क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या गुणवत्तेचे मानांकन ठरविणा-या नामांकीत संस्थेमार्फत “डी.एल.शाह. सुवर्ण पुरस्कार 2016” या राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथील विशेष समारंभात गौरविण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष आदिल झैनुलभाई व डी.एल.शहा ट्रस्टचे अध्यक्ष हरी तनेजा यांच्या शुभहस्ते इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी स्विकारला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अपंग व्यक्ती व मुले यांच्या पुनर्वसन व सबलीकरणाला प्राधान्य देत इ.टी.सी. केंद्राने सातत्याने अपंग कल्याणकारी अभिनव उपक्रम राबवित यशस्वी प्रगती केली आहे. या सेवाभावी कार्याला जगभरातून आलेल्या या क्षेत्रातील तज्ज्ञांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वेळोवेळी नावाजले आहे व आपले उत्कृष्ट अभिप्राय नोंदविले आहेत.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया मार्फत दिला जाणारा डी.एल.शाह. पुरस्कार शासकीय संस्था, खाजगी संस्था, निमशासकीय संस्था,शिक्षण क्षेत्र, आर्थिक क्षेत्र अशा पंधरा विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणा-या तसेच बहुकौशल्य कार्यप्रणाली राबवित माहिती तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणा-या संस्थाना प्रदान करण्यात येतो. या सर्व विभागातील विजेत्या संस्थामधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. केंद्राला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या 11 व्या राष्ट्रीय बैठकीत पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी आपल्या कार्याचे माहितीप्रद सादरीकरणकरण्याचा बहुमान देण्यात आला. यावेळी केंद्र संचालक डॉ.वर्षा भगत यांची अपंग व्यक्ती व मुले यांच्याकरीता वटवृक्षाप्रमाणे कार्य करणा-यानवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. केंद्राबद्दल सादरीकरणाव्दारे उपस्थित मान्यवरांना माहिती दिली.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि इ.टी.सी. केंद्र यांचे नाते 2010 पासून नेहमीच सकारात्मक राहिले असून 2012 मध्ये QCI NABET कडून प्रमाणित झाल्यानंतर इ.टी.सी. केंद्राने आदर्श नियोजन, उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनाचा पुरेपुर वापर याव्दारे नवनवीन आव्हाने व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत.
इ.टी.सी. केंद्राचा हा प्रगतीशील आलेख नजरेसमोर ठेवूनच यावर्षीच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया – डी.एल.शाह. सुवर्ण पुरस्कार 2016 करीता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी निवेदन केले व क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली येथे केंद्राचे यशस्वी सादरीकरण केले. सदर निवड प्रक्रियेअंतर्गत क्यू.सी.आय – नाबेटच्या अधिका-यांनी 6 ऑगस्ट2016 रोजी केंद्राला भेट देऊन येथील कार्यपध्दतीची संपूर्ण पाहणी केली व आपला उत्तम अभिप्राय नोंदविला. या विविध प्रकारच्या निरीक्षणानंतर यावर्षीच्या “क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया – डी.एल.शाह. सुवर्ण पुरस्कार 2016” करीता इ.टी.सी. केंद्राची निवड झाली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ.वर्षा भगत यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारल्यानंतर या पुरस्कारामुळे अपंग व्यक्ती व मुले यांच्या सबलीकरणाकरीता व त्यांना समाजाचा उपयुक्त घटक बनविण्याकरीता कार्य करणा-या सर्व व्यक्ती व संस्था यांना उत्तेजन मिळेल अशी आशा व्यक्त केली आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका यांच्या सहकार्याने इ.टी.सी. हा अपंग लोककल्याणकारी प्रकल्प नवी भरारी घेत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
यापूर्वी सन 2011 मध्ये नागरी प्रशासनातील सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल देशातील मानाचा मा. पंतप्रधान पुरस्कार (Prime Minister Award for Excellence in Public Administration) तसेच सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अपंग कल्याणकारी कार्य करणारी संस्थाविशेष पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रास प्राप्त झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील गौरवांकीत भारतीय गुणवत्ता परिषद – “डी.एल.शाह सुवर्ण पुरस्कार 2016” मुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.