राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिक्षण मंडळाला साकडे
नवी मुंबई : दहावीच्या परीक्षेत सलग तीन दिवस मुख्य विषयांचे पेपर असल्याने त्यात थोडा बदल करून एक दिवसाआड पेपर ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडे केली आहे. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे दडपण येऊ नये, म्हणून असा बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक लवकर विद्यार्थ्यांना द्यावे, विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी आकारली जात असतानाही काही शाळा परीक्षेचे हॉल तिकीट देताना पैसे आकारणी करणार्या शाळांवर कारवाई करावी, फेर पेपर तपासणीची माहिती विद्यार्थ्यांना 7 दिवसात द्यावी, अशी मागणी केली आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या पुणे येथील अध्यक्षांना देखील याबाबत लेखी निवेदन पाठविण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ऐरोली विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादीचे नगरसेवक गिरीष म्हात्रे, ऐरोली विधानसभा युवक अध्यक्ष राजेश मढवी, नवी मुंबई सोशल मिडीयाचे जयंत म्हात्रे, विद्यार्थी सेलचे नेरुळ तालुकाध्यक्ष तेजस फणसे, युवकचे वाशी तालुकाध्यक्ष निलेश शिंदे, प्रभाग क्रमांक-62 चे वॉर्ड अध्यक्ष कुणाल सुर्वे, जयेश पाटील, योगेश भगत, प्रसाद बोचरे त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्च 2017 मध्ये होणार्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार 7 मार्चपासून दहावी, तर 28 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. दहावीचे तीन मुख्य विषयांचे पेपर 20, 21 व 22 मार्चला आहेत. ते सलग असल्याने वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी एसएससी बोर्डाकडे केली आहे.
काही वर्षांपासून सलग परीक्षा न घेता एक किंवा दोन दिवसाआड एक पेपर घेण्यात येतो; परंतु या वेळी 20 मार्च रोजी विज्ञान, 21 मार्च रोजी सामाजिक शास्त्र-1 व 22 मार्च रोजी सामाजिक शास्त्र-2 असे सलग तीन दिवस पेपर असल्याने विद्यार्थ्यांवर दडपण येऊ शकते. ते टाळण्यासाठी वेळापत्रकात अंशतः बदल करून एक दिवसाआड पेपर घेण्यात यावा, असे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना भेडसाविणार्या अन्य मुद्यांविषयी चर्चा करून दत्तात्रय जगताप यांचे लक्ष वेधले.