पेंग्विन मृत्यूचा वाद आता लोकायुक्तांच्या कोर्टात
मुंबई : पेंग्विन मृत्यूप्रकरणचा वाद चांगलाच चिघळला असतानाच आता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. तर पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार लोकायुक्त कार्यालयाने राणीबागचे उपअधीक्षक डाँ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजता यासंबंधी लोकायुक्त कार्यालयात सुनावणी होणार असल्याची माहिती छेडा यांनी दिली.
पालिका या नोटीशीला काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विरोधी पक्षनेते छेडा यांनी पेंग्विन आणण्यापासून ते पेंग्विनच्या देखभालीपर्यंतच्या सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, अनेक नियमांचे उल्लंघन झाले आहे तर पेंग्विनचा मृत्यू राणीबागेतील असुविधांमुळेच झाल्याचा आरोप छेडा यांनी लोकायुक्तांच्या तक्रारीत केला आहे.
पेंग्विनच्या देखभालीत, त्यांच्या व्यवस्थेत हलगर्जीपणा झालाय का असा सवाल पालिका आयुक्तांना केलेल्या नोटीसी विचारण्यात आला आहे. तर पेंग्विनना ठेवण्यात येणारी जागा योग्य आहे काय़ तसेच पेंग्विनचा मृत्यू असुविधेमुळे झालाय का ? असेही अनेक प्रश्न प्राधिकरणाने पालिका आयुक्तांकडे या नोटीशीद्वारे केला आहे.