नवी मुंबई : महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in स्वरूपात अधिकृतरित्या अद्ययावत करतानाच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे, परवाने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत असून यामध्ये उद्योगधंद्यांसाठी आवश्यक व्यवसाय परवान्यांचाही समावेश आहे.
या अनुषंगाने पहिला ऑनलाईन व्यवसाय परवाना नेरूळ स्टेशन कॉम्प्लेक्स पश्चिम येथील श्रीम. ज्योती वैभव केसरकर यांच्या मार्च एन्टरप्राईजेस या केक शॉपला उपलब्ध करून देण्यात आला असून अशाप्रकारे ऑनलाईन व्यवसाय परवाना देणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.
महानगरपालिकेच्या वेबसाईटव्दारे नागरिकांना घरबसल्या महानगरपालिकेशी संबंधित आवश्यक प्रमाणपत्रे सहजपणे मिळावीत याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र अशा 16 आवश्यक नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्याच बरोबरीने नागरिकांना अधिक सुविधा मिळाव्यात यादृष्टीने (1) जाहिरात व आकाशचिन्हे परवाना, (2) कारखाने व उद्योगधंदे परवानगी (3) साठा परवाना, (4) व्यवसाय परवाना (5) चित्रपट चित्रीकरण परवानगी अशा आणखी 5 महत्वाच्या सेवाही ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाप्रकारे उद्योग व्यवसायासाठी आवश्यक परवाने ऑनलाईन उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे.
ई – गव्हर्नन्सव्दारे नागरिकांना सहज, सुलभ व गतिमान सेवा पुरविण्याकडे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष लक्ष दिले असून या सेवा उपलब्ध करून देताना त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली असून पूर्वी परवान्यांकरीता 12 वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते त्याची संख्या केवळ 5 महत्वाची कागदपत्रेच सादर करण्याइतके कमी करण्यात आलेले आहे, शिवाय परवाने मिळण्याकरीताचा कालावधीही 45 दिवसांवरून 17 दिवसांवर आणलेला आहे.
पहिला ऑनलाईन परवाना वितरीत करण्यात आलेल्या श्रीम. ज्योती वैभव केसरकर यांनीही आपला व्यवसाय परवानासाठीचा अर्ज दि. 19 ऑक्टोबर 2016 रोजी ऑनलाईन दाखल केला होता. हा अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच संबंधित परवाना विभागासह आरोग्य, नगररचना, अग्निशमन या तिन्ही विभागांकडे एक खिडकी संकल्पनेनुसार संगणकीय प्रणालीमार्फतच पाठविण्यात आला. तिन्ही विभागांकडून कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी करण्यात आली व त्याचे अभिप्राय ऑनलाईन नमूद करण्यात आले.
त्याचप्रमाणे परवाना विभागाकडून नेरूळ विभागीय क्षेत्रातील स्वच्छता निरीक्षकाकडून प्रत्यक्ष तपासणी करण्यात येऊन ऑनलाईन तपासणी अहवाल सादर करण्यात आला. अहवालानुसार संबंधित अर्जदारांना किती परवाना शुल्क भरायचे ? याची माहिती ई – मेल तसेच मोबाईल एस.एम.एस. व्दारे देण्यात आली. त्यानुसार संबंधित अर्जदारांनी ऑनलाईन परवाना शुल्क भरणा केल्यानंतर त्यांना त्याच क्षणी 2 नोव्हेंबर 2016 रोजी ऑनलाईन परवाना उपलब्ध करून देण्यात आला. विशेष म्हणजे त्या ऑनलाईन परवान्यावर परवाना विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर यांची डिजीटल स्वाक्षरी नोंदीत आहे.
अशाप्रकारे ऑनलाईन परवाना उपलब्ध झाल्यानंतर श्री. वैभव केसरकर यांनी परवाना विभागास भेट देऊन महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचविणा-या या अतिशय उत्तम ऑनलाईन सेवेबद्दल आभार व्यक्त करीत महापालिकेच्या कुठल्याही कार्यालयात न जाता अतिशय सोप्या आणि ठराविक वेळेत परवाने उपलब्ध करून देणा-या या कार्यप्रणालीचे कौतुक केले. अशाप्रकारे राज्यात पहिल्यांदा राबविण्यात येणा-या ऑनलाईन प्रणालीव्दारे परवाना मिळणारा पहिला नागरिक ठरल्याचा आनंद आणि समाधानही त्यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर या 21 नागरी सेवा सहज व सुलभ पध्दतीने उपलब्ध असून त्यावर क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकींग व्दारे ऑनलाईट पेमेंटची सुविधाही उपलब्ध आहे. तरी नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.