सुजित शिंदे
सत्याचा विजय झाला, नवी मुंबईकर जिंकले, मनसेचा जल्लोष
नवी मुंबई : नवी मुंबई मनपाचे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या अभद्र युतीच्या नगरसेवकांनी केलेला अविश्वास ठराव राज्याच्या नगरविकास खात्याने निलंबित करून मनपा आयुक्त मुंढे यांना तूर्तास तरी कायम ठेवल्याबद्दल नवी मुंबई मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तर हा सत्य व प्रामाणिकपणाचा ऐतिहासिक विजय असून, भ्रष्ट राजकारण्यांविरोधात नवी मुंबईकर जिंकले अशी प्रतिक्रिया मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे.
आयुक्त मुंढेंविरोधात सत्ताधारी विरोधक नगरसेवक एकटवले होते. मात्र फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच तुकाराम मुंढेंच्या म्हणजेच जनतेच्या भावनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे होती. मुंढेंच्या समर्थनार्थ मनसेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले होते तर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना भेटून प्रत्यक्ष चर्चा केली होती, इतकेच नव्हे तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ मिस्ड कॉल मोहिमेच्या माध्यमातून ही लोकांना आपले मत व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळवून दिले होते, तर मुंढेंना कायम न ठेवल्यास जेल भरोचा इशाराही दिला होता.
कुणाच्याही हितसंबंधांची पर्वा न करता शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी कठोर निर्णय घेणार्या अधिकार्याच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव असेल असे गजानन काळे यांनी पुढे सांगितले. भ्रष्ट राजकारणी-व्यापारी-भूमाफियांच्या अभद्र युती विरोधात सर्वसामान्य नवी मुंबईकर जिंकल्याची भावना नवी मुंबईकरांमध्ये आहे. येणार्या निवडणुकांमध्ये मतांच्या माध्यमातून या भ्रष्ट राजकारण्यांना तो घरचा रस्ता दाखवेल असा विश्वास शहर सचिव अॅड.कौस्तुभ मोरे यांनी व्यक्त केला आहे.
मात्र ज्यांच्या जमिनीवर ही नवी मुंबई उभी आहे, त्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर आयुक्तांनी हातोडा टाकू नये, उलट ही गरजेपोटी घरे नियमित कशी होतील या संदर्भात कायद्यामध्ये योग्य तो मार्ग शोधून काढावा अशी मागणी मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष व मनसेचे नेरूळ विभागप्रमुख सविनय म्हात्रे यांनी केली आहे. नवी मुंबईला भरभराटीस आणण्यासाठी मनसेने आयुक्त मुंढे यांना शुभेच्छा दिल्या असून, मुंढेंनी पुकारलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेस कायम साथ देण्याचे आश्वासन मनसेचे शहर सचिव रवींद्र वालावलकर यांनी याप्रसंगी दिले.