पालिका आयुक्तांचा आदेश
मुंबई – महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार असल्याने मोठया प्रमाणात कर्मचा-यांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात नागरी सेवा सुविधांवर परिणाम होऊ नये या कारणांसाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जानेवारी ते निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही रजा मंजूर करू नये असे आदेश दिले आहेत.
आगामी निवडणूकी दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रात साडे आठ हजार मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात येतात. या प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान ५ इतक्या संख्येने कर्मचा–यांची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त आकस्मिक गरज लक्षात घेऊन किमान १० टक्के राखीव कर्मचारीही निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. त्यानुसार निवडणूकीसाठी साधारणपणे ५० हजार एवढ्या संख्येतील कर्मचा–यांची आवश्यकता असते. यापैकी बहुतांश कर्मचारी महापालिकेच्या अखत्यारितील असतात. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर व नागरी सेवा सुविधांवर या बाबीचा परिणाम होऊ नये, यादृष्टीने व्यवस्थापकीय उपाययोजना म्हणून महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा–यांना जानेवारी पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रजा मंजूर न करण्याचे परिपत्रकही प्रशासनाने काढले आहे.