- नवी दिल्ली – 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि देशभरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर 50 दिवसांत सर्वकाही ठीक होईल, असं आश्वासन केंद्राकडून देण्यात आलं. मात्र अजूनही बँकांबाहेरच्या रांगा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. बँक आणि एटीएमच्या बाहेर आजही लोक रांगेत उभे दिसत आहेत. बँक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या असलेल्या मर्यादेमुळे लोकांना वारंवार रांगेत ताटकळत राहावं लागतं आहे. आतापर्यंत 30 डिसेंबरपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात येत होतं.
मात्र रोख रकमेचा तुटवडा अजूनही कायम असून, 30 डिसेंबरनंतरही बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार आहे. त्यामुळे 30 डिसेंबरनंतरही तुमची एटीएम आणि बँकेच्या लांबच लांब रांगेतून सुटका होण्याची शक्यता धूसर आहे. खरं तर आरबीआयला मागणीनुसार नोटा छापण्यात अडथळे येत आहेत, असं वृत्त बिझनेस स्टॅडर्डनं दिलं आहे.
नोटांचे छापखाने सतत सुरू असले तरी आरबीआय बाजारातील चलनाची कमतरता भरू शकत नाही. रोख रकमेच्या तुटवड्यामुळे बँकांनी आरबीआय आणि केंद्र सरकारला रोख रक्कम काढण्याची मर्यादा कायम ठेवण्याची विनंती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जोपर्यंत मुबलक प्रमाणात नवे चलन बाजारात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बँक किंवा एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कायम ठेवावी, अशी मागणी बँकांनी आरबीआयकडे केली आहे. जर रोख रक्कम काढण्याची मर्यादा संपुष्टात आणली, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता बँकांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत बाजारात 7 लाख कोटी रुपयांचं नवं चलन बाजारात आलं आहे.