गणेश इंगवले / नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने समाज विकास विभागामार्फत तसेच शिक्षण विभागामार्फत 27 डिसेंबरला वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात “बाल महोत्सव” संपन्न होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बाल-गोपाळांसाठी ही आनंदपर्वणी असून या महोत्सवात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, जादूचे प्रयोग, बालनाट्य अशी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्याचप्रमाणे या महोत्सवाच्या अनुषंगाने यापूर्वी घेण्यात आलेल्या वेषभुषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटिका स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
27 डिसेंबर 2016 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी 10 वाजल्यापासून उत्साही बालकांच्या उपस्थितीत हा महोत्सव संपन्न होणार असून यावेळी नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे तसेच ठाणे लोकसभा सदस्य खा. श्री. राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आ. सौ. मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. श्री. संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य आ. श्री. नरेंद्र पाटील, उपमहापौर श्री. अविनाश लाड, महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती श्री. शिवराम पाटील, सभागृह नेते श्री. जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले आणि महापालिका पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी या महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांमध्ये यापूर्वीच सहभाग घेतला असून या बाल महोत्सवामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुलांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.सायली शिंदे व उपसभापती सौ. सुजाता पाटील आणि समिती सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.