महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने क्रीडापटूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य देखील मिळावे या उद्देशाने खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले होते. या खेळाडू दत्तक घेण्याच्या योजनेची अंमलबजावणी होण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे होतकरु व उदयोन्मुख खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्याचे धोरण नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेले आहे.
त्यानुसार कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे संघ तयार करण्यात येणार असून प्रथम प्राधान्य नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खेळाडूंना असणार आहे. कबड्डी संघाकरीता 15 खेळाडू, खो-खो संघाकरीता 15 खेळाडू व शुटिंगबॉल संघाकरीता 10 खेळाडूंची करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणार आहे.
सदर संघांमध्ये विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संघाचे प्रतिनिधीत्व केलेले कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे खेळनिहाय अनुक्रमे 10, 10 व 06 खेळाडू आणि जिल्हास्तरावरील नवोदित अनुक्रमे 05, 05 व 04 अशा प्रकारे खेळाडू निवडण्यात येतील.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंना प्राधान्य राहील. परिपूर्ण संघाच्या बांधणीकरीता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खेळाडू उपलब्ध न झाल्यास महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील खेळाडूंना संधी देण्यात येईल.
या संघामध्ये निवड होणा-या खेळाडूंची 11 महिने करार पध्दतीने मासिक रु.15000/- इतक्या मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात येईल.त्याचबरोबर खेळाडूंना सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा व आवश्यक क्रीडा साहित्य महापालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल. देशांतर्गत होणा-या सर्व अधिकृत स्पर्धांमध्ये खेळाडूंना सहभागी होता येईल, ज्यामुळे खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यात भर पडून त्यांची कामगिरी उंचावण्यास निश्चितच मदत होईल.अशा प्रकारे एकाच वेळी तीन खेळांचे खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करणारी नवी मुंबई राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तत्पर असून महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर विविध खेळांचे क्रीडा प्रशिक्षण केंद्र व प्रतिभावंत खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे अशा योजना महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच सुरु करण्यात आलेल्या आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खेळाडू दत्तक घेऊन कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल खेळाचे संघ तयार करण्यात येणार असल्याने या खेळाच्या खेळाडूंना नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघात खेळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे या संघांच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या नावलौकिकातही लक्षणीय भर पडणार आहे. तरी यासाठी पात्र व इच्छुक खेळाडूंनी 25 एप्रिल 2017 पर्यंत आपले लेखी अर्ज सादर करावयाचे असून महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. तरी पात्र खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.