मनपा उद्यान अधिकारी तुषार पवार यांचे मनसेला आश्वासन
नवी मुंबई / अनंतकुमार गवई
नवी मुंबईतील अनेक उद्यानांच्या समस्यांबरोबरच सीवूड्स सेक्टर-४६ येथील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानाला सुद्धा सध्या समस्यांचा विळखा पडला आहे. या दुरावस्थेबाबत मनसे आक्रमक झाली असून, उद्यानाच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात या संदर्भात मनसे सीवूड्स विभागाने आज दि.११ एप्रिल २०१७ रोजी नवी मुंबई महानगरपालिका उद्यान अधिकारी श्री.तुषार पवार यांना निवेदन दिले. सध्या लहान मुलांना शाळेच्या सुट्ट्या पडल्या आहेत. मात्र समस्यांच्या घेरात अडकलेल्या या उद्यानामुळे लहानग्यांची निराशा होत असल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाने या प्रसंगी म्हटले.
मनपा उद्यान अधिकारी श्री.तुषार पवार यांना मनसेच्या सीवूड्स विभागाने याप्रसंगी उद्यानाची छायाचित्रांसाहित दुरावस्था विशद केली. क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानाचा प्रवेश द्वार पूर्णपणे मोडकळीस आला आहे. उद्यानातील आसन व्यवस्थेसाठी असणारे बेंचेस तुटलेल्या अवस्थेत आहेत. लहान मुलांचे प्रमुख आकर्षण असणारी झोपाळा, घसरगुंडी व इतर खेळणी कित्येक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. यासर्व समस्यांमुळे शाळेचे सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे लहान मुलांची निराशा होत असल्याचे सीवूड्स मनसे विभागाने याप्रसंगी लक्षात आणून दिले. उद्यान अधिकारी श्री.तुषार पवार यांनी मनसेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, येत्या १५ दिवसांत उद्यानाच्या सर्व समस्या सोडवू असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
सदर निवेदन देताना मनसे सीवूड्स पश्चिम विभागाचे उपविभाग अध्यक्ष अमोल (भाऊ) आयवळे, विभाग अध्यक्ष सचिन कदम , उपविभाग अध्यक्ष भरत पासलकर, शाखा अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, अरविंद मोरे, वैभव कांबळे, राजू खाडे, प्रद्युम्न हेगडे, रोजगार विभागाचे अप्पासाहेब कोठुळे, व मनसैनिक उपस्थित होते.