*संतप्त कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू*
*शताब्दीचा लढा चिघळण्याच्या स्थितीत* ; परिसेविका, अधिसेविका आणि कायम कामगारसुद्धा लढ्यात सामील होण्याच्या पवित्र्यात
मुंबई : गेले 12 दिवस सुरू असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी कामगारांचे आंदोलनाने आज तीव्र स्वरूप धारण केले आहे. 11 दिवस काम करून बैठा सत्याग्रह करणाऱ्या अन्यायग्रस्त कंत्राटी कामगारांनी आज *काम बंद आंदोल* पुकारले आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी 6 एप्रिल रोजी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन त्यात कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करू तसे आदेश संबंधितांना दिले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आज 12 व्या दिवशीही कामगारांना त्यांचे वेतन आणि थकबाकी देण्यात कसूर केल्याने कामगारांच्या आंदोलन आज चिघळण्याच्या स्थिती मध्ये आले आहे. या 240 कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी येथील कायम कामगार आणि स्टाफ आधीसेविका परिसेविका यांनी आंदोलनास पाठींबा दिला.
मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल च्या 240 कामगारांना गेले सहा – सहा महिने वेतन नाही, महत्वाचे म्हणजे या कामगारांना किमान वेतन, विशेष भत्ता ,विमा असे कामगार कायदा आणि किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन आणि लाभ दिले जात नाहीत. या बाबत या कामगारांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या झेंड्याखाली 12 दिवसापूर्वी सत्याग्रह सुरू केला होता. या सत्याग्रहात कामगार आपली ड्युटी करून सुट्टीच्या वेळेत वैद्यकीय अधीक्षकांच्या दलनाबाहेर शांततेने बैठा सत्याग्रह करत होते. या सत्याग्रहाची दाखल न घेता कामगारांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात श्रमजीवी कामगार संघटनेने 7 एप्रिल रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चाचे आयोजन केले होते.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आयुक्त अजोय मेहता यांनी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांना बैठकीसाठी आमंत्रित केले. 6 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या सर्व मागण्या मान्य करून कामगारांना थकबाकीसह किमान वेतन देण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे बैठकीत सांगितले. या बैठकीला आज सहा दिवस झाल्यानंतरसुद्धा या कामगारांच्या वेतनाबाबत आवश्यक त्या प्रक्रिया हॉस्पिटल प्रशासनाने पूर्ण केली नसल्याने कामगारांवर उपासमार आली असल्याने आज संघटनेने संतप्त होऊन कामबंद आंदोलन पुकारले आहे. इतके दिवस रुग्ण सेवेवर काहीही परिणाम होऊ नये म्हणून कामगार वेतन मिळत नसताना काम केले. मात्र आता मात्र सहनशीलता संपल्याचे सांगत कामगारांनी बंद जाहीर केला. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी हॉस्पिटल मधील कायम कामगार आणि अधिसेविका तसेच परिसेविका यांनी देखील या लढ्याला पाठिंबा देऊन आज आंदोलनात सामील होणार असल्याचे सांगितले.
NGOकरण करून ठेकेदारांकरवी कामगारांची चालवलेली पिळवणूक हॉस्पिटल प्रशासनाच्या सहभागाने सुरू असल्याचा आरोप करत आंदोलन आता अधिक तीव्र करणार असल्याचे इशारा यावेकी विवेक पंडित यांनी दिला. येथील वैद्यकीय अधीक्षक *डॉ. कृष्णकुमार पिंपळे* मनमानी आणि संशयास्पद कार्यपद्धतीवर पंडित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी या कामगारांना पाठींबा देण्यासाठी मीरा भाईंदर आणि वसई विरार मधील श्रमजीवी चे सभासद सहभागी झाले होते. श्रमजीवीच्या मुंबई जिल्हाध्यक्ष नलिनी बुजड, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक सापटे, संघटक सचिव प्रमोद पवार, महिला सचिव नंदा वाघे, जयश्री पाटील यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विवेक पंडित यांच्या आई रजनी पंडित यादेखील गेले 12 दिवस सतत आंदोलनात सहभागी आहेत.