नवी मुंबई / अनंतकुमार गवई
गेली वीस वर्षांपासून मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेवून संक्रमण शिबिरात वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सिडको निर्मित धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या आठ सोसायट्यांच्या पुनर्बांधणीकरिता बुधवारी सिडकोने ना हरकत दाखला दिला. परिणामी आता या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील नागरिकांचे दोन तपाहून अधीक काळ प्रतीक्षेत असलेले घराचे स्वप्न साकार होणार आहे.वाशी येथील हे रहिवाशी या धोकादायक इमारतीमध्ये राहत असताना सिडको आणि पालिकेच्या पायऱ्या झिजवत होते.
वाशी येथील सिडको निर्मित निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेल्या इमारती काही वर्षातच मोडकळीस आल्या होत्या. येथील काही इमारतींमधील कुटुंबांना सिडकोद्वारा जुईनगर मधील संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात आल्या नंतर पुन्हा वाशी मधील घरात प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा लागली होती. लाल फितीच्या कचाट्यात सापडलेला पुनर्बांधणी प्रकल्प सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी रखडला होता.टंडन समिती,मिराणी समिती आदी समित्यांनी या इमारती वास्तव्यास धोकादायक असल्याचा अहवाल सादर करून देखील हा पुनर्बांधणी प्रकल्प रखडला होता. दरम्यानच्या काळात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कामात अडथळा आणत १०० टक्के रहिवाश्यांची मंजुरीची जाचक अट लागू करण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र कायद्यात तशी तरतूद नसताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील हीच री पुढे ओढल्याने १०० टक्के सदस्य मंजुरी हाच निकष कायम ठेवला, मात्र कायद्याच्या पातळीवर ही जाचक अट टिकाव धरू शकली नाही. आता मतांच्या टक्केवारीवर इमारत पुनर्बांधणीला सिडकोचा नाहरकत दाखल्याची मंजुरी मिळविण्यात येथील रहिवाश्यांना नगरसेवक किशोर पाटकर यांच्या माध्यमातून यश मिळाले आहे. स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर यांनी दिलेला न्यायालयीन लढा व सिडकोच्या ना हरकत दाखल्यानंतर या पुनर्बांधणी प्रकल्पातील अडसर दूर झाला आहे.सिडको भवनात वाशी सेक्टर १० मधील श्रद्धा या गृहनिर्माण संस्थेला प्रातिनिधिक स्वरुपात नाहरकत दाखला देण्यात आला. वाशी सेक्टर ९ मधील गुलमोहोर,आशीर्वाद,अवनी,कैलास,एकता,पंचरत्न,एफ५ एसएसवी या सात गृहनिर्माण सोसायट्यांना बुधवरी सायंकाळ पर्यंत सिडको पुनर्विकासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणार असल्याची माहिती यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी दिली. हे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या सोसायट्यातील अडीच हजार कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे. आगामी काळात शहरातील आणखी सुमारे ५० हजार कुटुंबांच्या घरांच्या इमा पुनर्बांधणीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे अशी प्रतिक्रिया नगरसेवक किशोर पाटकर यांनी दिली आहे . इमारती मनपाने धोकादायक घोषित केल्यावर देखील विविध कारणांनी पुनर्विकास रखडला होता.सिडकोने ऐंशीच्या दशकामध्ये बांधलेली ही घरे निष्कृष्ट बांधकामामुळे धोकादायक झाली होती.या इमारतींच्या पुनर्बांधणी प्रकल्पामुळे मनपाला वाढीव रस्ते,नाले,उद्यान,मैदान आणि इतर मुलभूत सुविधांसाठी पंधरा टक्के जागा एकूण बांधकाम क्षेत्रफळ तुलनेत उपलब्ध होणार असल्याने मुलभूत सुविधांवरील ताण कमी होणार आहे. अडीच वाढीव चटई निर्देशांक या बांधकामाला मिळणार आहे.या पुनर्विकास प्रकल्पामुळे शहराचा कायापालट होणार आहे. वाशी परिसरात समाज मंदिर,वाहने पार्किंगसाठी मोकळी जागा, , सोसायटी परिसरात पाच टक्के मोकळी जागा,या सर्व सुविधा नियमाप्रमाणे दिल्या जाणार आहेत.सिडकोने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यावर या परिसरातील हजारो रहिवाश्यांनी एकच जल्लोष करत उत्सव साजरा केला.नगरसेवक किशोर पाटकर यांच्या कार्यालयात या रहिवाश्यांनी जावून हा जल्लोष केला.या पुनर्बांधणी प्रकल्पासाठी मुंडन आंदोलन,वाशी परिसरात नगरसेवक किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखाली चड्डी बनियान व थाळी नाद मोर्चा,असे विविध आंदोलने, याबरोबर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देवून या प्रकरणाची दाहकता दिल्ली दरबारी मांडण्यात आली होती.याची दखल सिडकोला घ्यावी लागली होती.या सर्व पाठपुराव्यानंतर बुधवारी हजारो रहिवाश्यांचे पुनर्विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण,व्यवस्थापक शहर सेवा फैय्याज खान यांनी प्रातिनिधिक स्वरुपात सोसायट्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले.यावेळी उपमहापौर अविनाश लाड ,नगरसेवक किशोर पाटकर ,आणि पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोसायटीमधील प्रतिनिधी उपस्थित होते.