नवी मुंबई / अनंतकुमार गवई
जुईनगर रेल्वे स्थानक ते सानपाडा रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी दत्त मंदिराजवळ रेल्वे रूळालगत असलेल्या सिडकोच्या दीड हेक्टर भूखंडाला डेम्ब्रिज माफियांनी डम्पिंग ग्राउंड बनविण्याचा घाट घातला आहे. डेम्ब्रीज माफियांकडून येथे मोठ्या प्रमाणावर डेम्ब्रिज टाकण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे या भूखंडाला बकालपणा आला असून हा भूखंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.भूखंडाच्या आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याकडे सिडको प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. डेम्ब्रिज माफियांकडून सिडकोच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी मिळत असून हे अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे.सिडकोच्या उदासीनतेमुळे डेम्ब्रीज माफियांचे चांगलेच फावले आहे.या भूखंडाचा सिडको प्रशासनाकडून विकास करण्यास सतत उदासीनता दाखवली जात असल्याने या भूखंडाला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. यापूर्वीही सिडकोच्या वरिष्ठ नियोजनकार प्रिया के यांनी “या भूखंडावर सुरक्षा रक्षक तैनात करून डेम्ब्रीज माफियांचे अतिक्रमण थांबविले जाईल.तसेच या भूखंडाचा विकास केला जाईल” असे सांगितले होते.मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केवळ खोट्या अश्वासनावरच बोळवण करून रहिवाशांच्या तोंडाला पाने पुसली आहे.त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.