* इमारतीचा पुर्नविकासास प्रशासकीय कामामुळे विलंब
* रविवारी सकाळी 9 वाजता घडली ही घटना
* सायन येथील अतिदक्षता रूग्णालयात उपचार सुरू
मुंबई : मुंबईमधील विक्रोळी उपनगरामध्ये कन्नमवार नगर 2 मधील इमारत क्रमांक 71 मधील तिसर्या मजल्यावर रविवारी सकाळी 9 वाजता घराच्या छतासह पंखा अंगावर कोसळून वडिलांसह मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघांवर मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. विनोद मोरे (40), आर्यन मोरे (5) अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मोरे कुटुंब भाड्याने गेल्या वर्षभरापासून येथे राहतात. रुग्णालयात काम करत असलेले मोरे पत्नी, मुलगा आर्यन आणि 8 महिन्याच्या मुलीसोबत राहतात. रविवारची सुट्टी असल्याने ते मुलगा आणि मुलीसोबत पंख्याखाली झोपले होते. सकाळी पाणी आल्याने पत्नी स्वयंपाक घरात काम आवरण्यास उठली. तिच्यापाठोपाठ मुलगी आईसोबत स्वयंपाक घरात गेली. अशात सकाळी 9 च्या सुमारास पंखा छतासह खाली कोसळला. या दुर्घटनेत विनोद आणि आर्यन खाली अडकले. पंखा विनोद यांच्या छातीवरच कोसल्याने ते यात गंभीर जखमी आहे. घराच्या भिंतीत विजही प्रवाहीत झाली होती. स्थानिक रहीवाशांच्या मदतीने तब्बल तासाभराने त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तात्काळ महात्मा फुले रुग्णालयातुन सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये त्यांची मुलगी आणि पत्नी थोडक्यात बचावली. या घटनेमुळे विक्रोळी परिसरात खळबळ उडाली.
ही इमारत काही वर्षापासून टेकूच्या आधारावर उभी आहे. यापूर्वीही छत कोसळण्याचे प्रकार झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या इमारतीचा पुनर्विकास प्रशासकीय कामांमुळे प्रलंबित आहे. या ईमारतीमधील रहिवाशी जीव मुठित धरून येथे राहत आहेत.