साईनाथ भोईर
नवी मुंबई : समाजव्यवस्थेचे महिलांचे अनन्यसाधारण महत्व कोणीही नाकारू शकत नाही. आज बैलगाडी चालविण्यापासून विमान चालविण्यापर्यत अनेक कामे महिला वर्ग सहजगत्या करताना पहावयास मिळत आहे. शिवसेनेची संगिता दिलीप आमले नावाची नेरुळ नोडमधील एक महिला रणरागिनी एका मोटर ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून महिलांना वाहतुक व्यवसायाच्या माध्यमातून स्वबळावर उभे राहण्यासाठी मदत करत आहे. समाजव्यवस्थेमध्ये आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणार्या सावित्रीच्या या आधुनिक लेकीच्या कार्याची दखल न घेणे म्हणजे संगिता दिलीप आमले यांच्या समाजसेवेला डावलण्यासारखेच होईल.
शिवसेना संघटनेमध्ये अनेक महिला ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यत झळकताना आपण पाहिल्या आहेत. 80 टक्केसमाजकारण आणि 20 टक्केराजकारण या घटनेची अंमलबजावणी करताना तुरळक महिला पदाधिकारी व महिला शिवसैनिक पहावयास मिळतात. पण नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सौ. संगीता दिलीप आमले ही शिवसेनेची सर्वसामान्य महिला रणरागिनी कार्यकर्ती शिवसेनाप्रमुखांच्या घटनेनुसार आजही समाजकार्य करताना पहावयास मिळत आहे. अनेक महिलांनी वाहन चालविण्यास शिकावे व वाहतुक व्यवसायामध्ये आपले अस्तित्व निर्माण करावे यासाठी गेल्या काही वर्षापासून परिश्रम करणार्या सौ. संगिता दिलीप आमले या महिला शिवसैनिकांच्या अथक परिश्रमामुळे आज नवी मुंबईत रिक्षा चालविणारी गुलाबी गॅग आपणास ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.
मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्षाची वाढ होत नाही असे म्हटले जाते. पण शिवसेनेच्या सौ. संगिता दिलीप आमले या अपवाद ठरल्या आहे. यजमान दिलीप किसनराव आमले हे नवी मुंबईत प्रभाग 86 चे शाखाप्रमुख असून महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत. परंतु सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षात सक्रिय असणार्या संगिता आमले यांनी चार वर्षापूर्वी अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलची स्थापना करताना महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देत वाहतुक व्यवसायामध्ये स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयास केला आहे.
संगिता आमले या गेल्या चार वर्षापासून नेरूळ नोडमध्ये मोटर ट्रेनिंग स्कूल चालवित आहेत. गेल्या चार वर्षात त्यांनी 1500 हून अधिक वाहन चालविण्याचे परवाने संबंधितांना मिळवून दिले आहेत. महिलांनी वाहन चालवावे व वाहतुक व्यवसायाच्या माध्यमातून स्वबळावर सक्षमपणे उभे राहत संसाराला हातभार लावावा यासाठी त्या सातत्याने जनजागृती व प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या चार महिन्यापासून त्यांनी ना नफा, ना तोटा या तत्वावर महिलांना रिक्षा चालविण्याचे चालक परवाने देण्याचे कार्य सुरू केले आहे. नवी मुंबईत रिक्षा चालविण्याकरिता 75 महिलांना आरटीओरकडून इरादापत्र (परमिट) वितरीत करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात चाळीसच्या आसपास आहे. नवी मुंबईत महिला चालवित असलेल्या रिक्षांची संख्या चाळीसच्या आसपास असली तरी त्यातील 17 रिक्षा या संगिता आमले यांच्या मोटर ट्रेनिंगमधून प्रशिक्षण घेवून परवाना घेतलेल्या महिला आहेत. सध्या 100 महिला रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देवून संगिता आमले यांनी त्यांना रिक्षाचा बॅच मिळवून दिलेले आहेत. गुरूवारी (दि.20 एप्रिल) 18 महिलांना प्रशिक्षण देवून त्यांना लवकरच चालक परवाने मिळतील. आजमितीला 40 महिला रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण संगीता आमलेंच्या माध्यमातून करत आहेत.
संगिता आमले या मोटर ट्रेनिंगच्या माध्यमातून महिलांना वाहतुक व्यवसायामध्ये स्थिरावण्याचे करत असलेल्या कार्याची राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेत संगिता आमलेंच्या कार्याची प्रशंसा केली आहे. शिवसेनेच्या नवी मुंबई महिला संघटनेने शिवसेनेच्या जिल्हा संघठक सौ. रंजना शिंत्रे यांच्या माध्यमातून संगिता आमलेंना महिलांना रिक्षा चालविण्याकरिता एक नवीन रिक्षा अंकिता मोटर ट्रेनिंगला भेट दिली आहे.
पदवीपर्यतचे शिक्षण घेतलेल्या संगिता आमले यांचे सामाजिक क्षेत्रासोबत राजकीय क्षेत्रातही कार्य उल्लेखनीय आहे. 12 वर्षे काँग्रेस पक्षात काम केल्यावर 2015 साली त्यांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला. 2010 ते 2015 या कालावधीत त्यांनी शिधावाटप समितीच्या अशासकीय सदस्या म्हणून काम करताना नेरूळ नोडमधील रहीवाशांना शिधापत्रिका मिळवून देणे, नावे वाढविणे, नावे कमी करणे आदी कामे त्या पदरमोड करून केली आहेत. त्रिमूर्ती महिला मंडळाच्या माध्यमातून गेली 15 वर्षे नेरूळ नोडमधील सामाजिक कार्यात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. वाहतुक या क्षेत्राला प्राधान्य देताना महिला रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा एककलमी कार्यक्रम राबविल्याने भविष्यात नवी मुंबईत रिक्षा व्यवसायात गुलाबी गॅगचे अतिक्रमण झालेले आपणास पहावयास मिळेल.