साईनाथ भोईर
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह नाट्य रसिकांप्रमाणेच नाट्य कलावंतांमध्येही आपुलकीचे स्थान मिळवून आहे. 22 एप्रिल 2017 रोजी दुपारच्या सत्रातील सायं. 4.30 वा. चा नाटयप्रयोग संपल्यानंतर रंगमंचावर रात्रीच्या प्रयोगाकरीता नाट्यप्रयोगाच्या अनुषंगाने प्रकाश योजना व्यवस्था करीत असताना प्रकाश योजनेसाठी मंचाच्या वरील बाजूस असलेला कॅनरा कंपनीचा टेली क्लेम्बरचा एक रोप अचानक निसटल्यामुळे आकस्मिकरित्या खाली आला.
सदर टेली क्लेम्बर नाट्यगृहाच्या सुरूवातीपासून म्हणजे सन 1997 पासून कार्यरत असून नाट्यगृहाच्या यंत्रणेची नियमित तपासणी करण्यात येत असते शिवाय ती प्रत्येक प्रयोगाप्रसंगी वापरली जात असल्याने त्याच्यामधील कोणताही दोष निदर्शनास आल्यास त्याचे त्तात्काळ निराकरण करण्यात येत असते. तथापि सदर टेली क्लेम्बरच्या रोपबाबत तसा कोणताही दोष आढळून आलेला नसल्याने तो अचानकपणे खाली येणे ही आकस्मिकरित्या उद्भवलेली दुर्देवी घटना आहे.
तथापि सदर घटना घडल्यामुळे रात्रीच्या प्रयोगात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता पर्यायी व्यवस्था असल्याने हा प्रयोग वेळेत व व्यवस्थितरित्या सुरू झाला व पार पडला. मात्र या बाबीची गंभीर दखल घेत विष्णुदास भावे नाट्यगृहातील सदर टेली क्लेम्बर रोपसह इतर यांत्रिक बाबींची अभियांत्रिकी विभागामार्फत तातडीने तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली असून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
शिवाय विष्णुदास भावे नाट्यगृहाचा सर्वोतोपरी कायापालट करण्यात येत असून त्याठिकाणी अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. यामध्ये विशेषत्वाने अंतर्गत भागाच्या नुतनीकरणांतर्गत फ्लोअरींग बदलणे, भिंतींचे फिनीशींग, फॉल्स सिलींग, कॉलम क्लॅडींग, पॅनलींग, म्युरल्स, वॉल पेपर अशा बाबींचा समावेश आहे.
त्याशिवाय याठिकाणी आधुनिक प्रकारची व्ही.आर.व्ही. वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात येणार असल्याने वीजेचा वापर कमी होऊन पाण्याची आवश्यकता असणार नाही तसेच सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला जाणार असल्याने नाट्यगृहाच्या वीज खर्चात बचत होईल. महत्वाचे म्हणजे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना वरच्या मजल्यावर विनासायास सुलभ रितीने जाता यावे याकरिता उद्वाहनाची सोय करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे ध्वनी व प्रकाश व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण, कलावंत खोल्या व कार्यालयाचे आधुनिकीकरण, प्रवेश लॉबीचे नुतनीकरण, क्राय रूमचे नुतनीकरण, कला प्रदर्शन दालन अशा विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. याद्वारेे विष्णुदास भावे नाट्यगृहास अधिक आकर्षकता व झळाळी प्राप्त होणार आहे.