साईनाथ भोईर
नवी मुंबई : विष्णुदास भावे नाट्यगृहाबद्दल सातत्याने नवी मुंबई मनसेने आवाज उठवला आहे. मात्र तरीही थातूर मातुर मलमपट्टी करण्यापलीकडे काहीही न झाल्यामुळे आज मनसे नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे संदीप गलुगडे, निलेश बाणखेले, श्रीकांत माने यांच्या नेतृत्वाखाली मनपा शहर अभियंता मोहन डगावकर यांच्या दालनामध्ये भावे नाट्यगृहाबाबतची निवेदने व बातम्या असलेले तोरण बांधून अभिनव असे “पताका आंदोलन” केले. या आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शहर अभियंता मोहन डगावकर यांचे दालन “जागे व्हा जागे व्हा शहर अभियंता जागे व्हा”, “अशा प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वरती पाय”,”भावे नाट्यगृहाचे काम सुरु करा सुरु करा” या घोषणांनी नवी मुंबई महापालिका परिसर दणाणून सोडला. मनसेचा रुद्रावतार पाहून शहर अभियंता मोहन डगावकर यांनी भावे नाट्यगृहाची दुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत सुरु करू असे लेखी पत्र मनसेच्या शिष्टमंडळाला दिले व मनसे सोबत उद्या पाहणी दौरा करण्याचे मान्य केले.
गेल्या शनिवार दि.२२ एप्रिल २०१७ रोजी ‘षडयंत्र’ या नाटकाचा शुभारंभ प्रयोग सुरु होण्याअगोदर स्लॅब मधून निघून टेलीक्लाइंबर मशीन स्टेजवर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मनपाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे मनसेने म्हटले आहे. हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत भावे नाट्यगृहाची दुरावस्था तात्काळ मार्गी लावण्यात आली नाहीतर शहर अभियंता मोहन डगावकर यांना महापालिकेत येण्यास मज्जाव करू असा इशारा याप्रसंगी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वीच (दि.२४ एप्रिल २०१७) मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भावे नाट्यगृहाची पाहणी केली असता नाट्यगृहाची परिस्थिती जैसे थे असल्याचे लक्षात आले. इलेक्ट्रिकच्या वायर बाहेर लोंबकळत असणे, अनेक ठिकाणी उघड्या DP, अद्ययावत इलेक्ट्रिकचे साहित्य न लावणे, पंख्यांची दुर्दशा, AC प्लांट नादुरुस्त अवस्थेत, साऊंड सिस्टीम नादुरुस्त, एकीकडे शासन वीज बचतीचा संदेश देते मात्र शासनाचा भाग असलेल्या मनपाने नाट्यगृहात अनेक ठिकाणी १५०/२५० व्हॅट चे हॅलोजेन किंवा लाईट वापरलेल्या आहेत त्याच बरोबर अनेक ठिकाणी भिंतींना पापुद्रे जाणे, मेकअप रूममधल्या वॉशरूम्सची दुरावस्था, तालीम रूम जिथे अनेक मराठी कलावंत प्रयोगाअगोदर तालीम करतात तिथे प्राणी राहतात की काय अशी शंका यावी. मेकअप रूम बरोबर कलावंतांच्या रेस्ट रुमच्या छतांचे छप्पर निघणे, रूम गॅलरीच्या भितींची दुर्दशा, खुर्च्यांची दयनीय परिस्थिती, अत्यंत महत्वाची अशी अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त असणे अशा एक ना अनेक तक्रारी, समस्या असल्याचे छायाचित्रांसाहित शहर अभियंत्यांच्या मनसेने याप्रसंगी लक्षात आणून दिले.
मनसेच्या शिष्टमंडळात याप्रसंगी संदीप गलुगडे, श्रीकांत माने, निलेश बाणखेले, रवींद्र वालावलकर, विनोद पार्टे, डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, नितीन चव्हाण, भालचंद्र माने, सुनील वाशिवले, गणेश धनावडे, वैभव बारवे, स्वप्नील गाडगे, आप्पासाहेब कोठुळे, चंद्रकांत महाडिक, अभिजित देसाई, विनय कांबळे, विलास घोणे, राजेश ढवळे, उमरखान देशमुख, विराट शृंगारे, देवा प्रसाद, सागर नाईकरे, बाळकृष्ण जाधव व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.