नवी मुंबई : साईनाथ भोईर
विभागवार पक्ष कार्यालये उघडून लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यानी जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजेत. लोकांसाठी वेळ दिला पाहिजे, असा सल्ला लोकनेते गणेश नाईक यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह या मेळाव्याच्या निमित्ताने खचाखच भरले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, युवकअध्यक्ष सुरज पाटील, महिलाअध्यक्षा माधुरी सुतार, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ऍड.जब्बार खान, सेवादलाचे अध्यक्ष दिनेश पारेख, पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, पालिकेचे सभागृहनेते जयवंत सुतार, परिवहन समितीचे सभापती श्याम महाडिक आदींसह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, विविध समित्यांचे सभापती, जिल्हा कार्यकारिणी, तालुकाअध्यक्ष, वॉर्डअध्यक्ष आदी मोठया संख्येने लोकनेते नाईक यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते.
पालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईचा कारभार करण्यासाठी जनतेने आपल्याला कौल दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून जनतेसाठीचा निधी जनतेसाठीच खर्च व्हायला हवा, असे ते म्हणाले. आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा अशा सर्व आवश्यक सुविधांवर होणारा खर्च, त्यांची कार्यप्रणाली, उपलब्ध मनुष्यबळ, आवश्यक सुधारणा या सर्वांचा सर्वांगिण अभ्यास करुन या नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांच्या समन्वय असणे गरजेचे आहे, असे सांगत २० वर्षे कोणताही कर वाढविणार नाही, असे आश्वासन दिले होते. १३ वर्षे या आश्वासनाची पूर्तता होत असून पुढील ७ वर्षे देखील कोणताच कर वाढविणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. नवी मुंबई हे प्रगतीशील शहर आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या क्रिसील या संस्थेने नवी मुंबईला ए प्लस प्लस पतमानांकन दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. नवी मुंबईचे सिंगापूर किंवा दुबईसारखे जागतिक दर्जाचे शहर निश्चितच होईल मात्र त्यासाठी आपली मानसिकता बदलायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. यापुढील राजकारण हे पैसा आणि सत्तेचे असेल. त्याचा जर सामना करायचा असेल तर संघटनात्मक ताकद वाढवायला हवी, असे सांगून संघटनेच्या माध्यमातून केवळ राजकारण न करता समाजाशी एकरुप होणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. ५ जून रोजी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आणि १० जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेचे कार्यक्रम हाती घ्यावेत, असे निर्देश लोकनेते नाईक यांनी दिले.