मुंबई : राज्यातील जनतेचा अन्नदाता असलेला बळीराजा संपावर जाणे ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह बाब नाही. शेतकर्यांच्या संपाबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावा. राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकर्यांच्या संपाबाबत सत्ताधार्यांसह विरोधकांनीही राजकारण करू नये असे आवाहन एमआयएमचे मुंबईतील आमदार ऍड. वारिस पठाण यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केले.
शेतकर्यांच्या मागण्यांकडे आणि त्याला शेती करताना भेडसावणार्या समस्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच शेतकर्याला संपावर जावे लागले आहे, या पार्श्वभूमीचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. शेतकरी संपावर तोडगा काढताना चर्चेमध्ये फक्त शेतकर्यांनाच समाविष्ठ करून घ्यावे. शेतकर्यांचा संप हा अंत्यत संवेदनशील विषय असून यावर कोणीही आपली राजकीय पोळी भाजून घेवू नये. शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या हा आपल्या राज्याला कलंक असून आपल्या पोषणकर्त्यालाच आत्महत्या करावी लागत आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेवून शेतकर्यांच्या समाधानाकरता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आमदार ऍड. वारिस पठाण यांनी यावेळी सांगितले.