अनंतकुमार गवई
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1 ते 15 जून या पंधरवडा कालावधीत कचरा वर्गीकरणाची विशेष मोहीम राबवून कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी कच-याचे ओला व सुका असे वर्गाकरण करून हिरव्या कुंडीत ओला कचरा व निळ्या कुंडीत सुका कचरा तसेच लाल कुंडीत घातक व ई कचरा टाकावयाचा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच ओला व सुका कचरा वर्गीकरणास नागरी भागात सुरूवात झाली असून त्यास मोठ्या प्रमाणावर नागरी सहभाग लाभला आहे. महानगरपालिकेमार्फत सोसायट्यांना त्यांच्या फ्लॅटस्मधील सामुहिक कचरा संकलनासाठी दोन वेगवेगळ्या रंगांचे कच-याचे मोठे डबेही महानगरपालिकेमार्फत देण्यात आले आहेत.
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत नवी मुंबई हे राज्यात सर्वप्रथम व देशात आठव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून भारत सरकारमार्फत मानांकीत होत असताना त्यामध्ये कचरा वर्गीकरण प्रणालीचाही सिंहाचा वाटा आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत पहिल्या नगरविकास दिनानिमित्त कचरा वर्गीकरणामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेस सन्मानीत करण्यात आले आहे.
हाच नावलौकिक टिकवून ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कचरा वर्गीकरणासंबंधी विशेष स्वच्छता मोहीम संपू्र्ण महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे.
याअनुषंगाने महापालिकेच्या सर्वच प्रभागात सुक्या कच-यासाठी निळ्या कुंड्या व ओल्या कच-यासाठी हिरव्या कुंड्यांचे वाटप करण्यात येऊन निरंतर कचरा वर्गीकरण करण्याची सामुहिक प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. तसेच ई-कचरा व घातक कच-यासाठी प्रायोगिक तत्वावर लाल रंगांच्या कचरा कुंड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मोहीमेमध्ये स्थानिक नगरसेवकांसह प्रभाग क्षेत्रातील विविध क्षेत्रातील संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये, पर्यावरणप्रेमी नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे.
दिनांक 5 जून रोजी सकाळी 7.00 वा., वंडर्स पार्क, सेक्टर 19 ए, नेरुळ येथे नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम सुप्रसिध्द संगीतकार गायक तथा स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अँबेसेडर श्री. शंकर महादेवन यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे.
नवी मुंबई शहराचा देशातील नामांकीत स्वच्छ शहर म्हणून असलेले मानांकन उंचाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष सहभाग स्वच्छता मोहिमेत अत्यंत आवश्यक आहे. याकरीता ओला आणि सुका कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी वेगवेगळा ठेवणे आणि महानगरपालिकेच्या कचरा गाडीत तो वेगवेगळा देणे ही दैनंदिन सवय नागरिकांनी स्वत: अंगिकारणे गरजेचे आहे. म्हणूनच 5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे ओचित्य साधून कचरा वर्गीकरणाची शपथ घेऊन आपल्या नवी मुंबई शहराचे स्वच्छतेतील मानांकन उंचाविण्यासाठी नागरिकांनी आपापल्या प्रभाग क्षेत्रात आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.