सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : विद्युतसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द असून कर्तव्यात हलगर्जीपणा करणारया वीजवितरणच्या अधिकारी,कर्मचारयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा, नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर वीज ग्राहकांच्या प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पनवेलमध्ये जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरणासंदर्भातील सातत्याने उद्भवणार्या समस्या, त्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणारी परंपरागत पध्दत यामध्ये दुरूस्ती करावी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. बावनकुळे यांच्याकडे केली होती.आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल परिसरातील वीजेच्या प्रश्नासंदर्भात नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत ना. बावनकुळे यांनी मुंबई येथे त्यांच्या दालनात अधिकारयांसमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीस पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारूशिला घरत, गटनेते परेश ठाकूर, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, विजय चिपळेकर, अमर पाटील तेजस कांडपिळे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी तसेच अधिकारी उपस्थित होते.
नामदार बावनकुळे यांनी यावेळी बैठकीत सांगितले की, वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वत्तोपरी प्रयत्नशिल आहोत. ग्राहकांना विना अडचण वीज पुरवठा झाला पाहिजे, यासाठी पध्दतीमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. ग्राहकांना त्रास होवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी देतानाच कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर लवकरच पनवेलमध्ये जनता दरबार घेणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.