मुंबई : मध्यावधी निवडणूकांपेक्षाही नारायण राणे आणि राधाकृष्ण विखेपाटील यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांची दिल्ली हायकमांडनेही दखल घेतली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटना बांधणीवर लक्ष देण्याचे दिल्लीवरून निर्देश आले असल्याची चर्चा काँग्रेस पक्षात सुरू आहे. सध्या अडगळीत असलेल्या इंटकवरही काँग्रेसकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले असून सध्याच महाराष्ट्र इंटक अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनाही लवकरच नारळ देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ऑक्टोबरपर्यत काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणूका पूर्ण करणार असल्याचे काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे. 2010 नंतर काँग्रेसच्या पक्षसंघटनात्मक निवडणूका दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्याने निवडणूक आयोगाने डिसेंबर 2017च्या आत निवडणूका घेण्याचे काँग्रेस पक्षाला निर्देश दिले आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातून सदस्य नोंदणीचे अहवाल मागविण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस संलग्न बाराही सेलच्या कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत.
काँग्रेसची कामगार संघटना इंटक ही एकेकाळी कामगार क्षेत्रातील बलाढ्य अशी कामगार संघटना होती. काँग्रेस पक्षाच्या सभा, मेळावे, आंदोलनांना इंटकचेच पाठबळ होते. पण आता सध्या इंटक अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याने इंटकवर विशेष लक्ष देण्याचे काँग्रेस पक्षाने ठरविले आहे. इंटकच्या नियुक्त्या दिल्लीवरून होत असल्या तरी इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांना महाराष्ट्रात इंटकचा प्रभाव वाढविण्यात अपयश आल्याचे काँग्रेस पक्षात बोलले जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडूनही इंटकसाठी प्रभावशाली कामगार नेत्याचा शोध सुरू असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
छाजेड यांच्या जागेसाठी महेंद्र घरत आणि रवींद्र सावंत या दोन नावांची प्रदेश पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे. घरत यांच्या माध्यमातून आगरी चेहरा व सावंत यांच्या माध्यमातून मागासवर्गीय चेहरा हे कॉर्डही काँग्रेस पक्ष निवडणूकीत खेळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महेंद्र घरत हे रायगड पट्ट्यात तर सावंत हे नवी मुंबई, पनवेल आणि ठाणे पट्ट्यातील कंपन्या व कारखान्यात सक्रिय असून त्यांच्या स्वत:च्या कामगार संघटना आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात कामगार नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे इंटकचा काँग्रेस पक्षाला हातभार लागावा यासाठी इंटकची कार्यकारिणी दिल्लीवरूनच नव्याने नियुक्त केली जाणार आहे व त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचाही निर्णय विचारात घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.