सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याची परंपरा आणि संस्कृती असलेल्या गणेशोत्सवाला २५ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर आणि तळोजे आदी शहरांतील रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने श्रींच्या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यास गणेश मंडळांना खूप त्रास होणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागामध्येही तीच अवस्था असल्याने स्वच्छतेसोबत रस्त्यांची डागडुजी अग्रक्रमाने हाती घ्यावी, अशी मागणी संघर्ष समितीने महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली. याबाबत डॉ. शिंदे यांनी सकारात्मकता व्यक्त केली आहे. रस्त्याची डागडुजी करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.
संघर्षने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने आतापासूनच मंडळांची लगबग सुरू झाली आहे. महापालिकेने नियोजन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासह घरगुती गणेशोत्सवही हजारोंच्या पटीने साजरा होत आहे. त्याकरीताही सर्वत्र पवित्र आणि मंगलमय वातावरण राहावे, याकरीता आतापासून स्वच्छता आणि रस्त्यांची डागडुजी तसेच विसर्जनस्थळी नियोजनपूर्ण व्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करणे हिताचे ठरेल, असे मत संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी त्या निवेदनातून व्यक्त केले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळावर महापालिकेकडून स्वागत कमानींसह भक्तांची व्यवस्था आणि अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन सोहळ्याची सांगता व्हावी, यादृष्टीने अनेक उपाययोजना कराव्यात. त्याकरीता गणेश भक्तांच्या भावनेचा आदर करून नियोजन करावे. परंतु, तत्पूर्वी रस्त्यांची डागडुजी चांगल्या प्रकारे होईल, याची व्यवस्था करावी, असे साकडे आयुक्त डॉ. शिंदे यांना घातले आहे.
स्वच्छ आणि खड्डेमुक्त मार्ग तयार करा
गणेश भक्त आणि खुद्द बाप्पाला खड्ड्यांतून मार्ग काढावा लागू नये, म्हणून महापालिकेने काळजी घेणे गरजेचे आहे. खड्डे भरण्याचा फार्स न करता, ते खड्डे पावसाच्या जोरदार मार्याने उखडले जाणार नाहीत, याची दक्षता घेवून काम केले पाहिजे. त्याशिवाय आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गाची विशेष दक्षता घेवून तो मार्ग खड्डेमुक्त आणि स्वच्छ राहिल, याची खबरदारी घ्यावी, असे पत्रातून सुचित करण्यात आले आहे.
संघर्षचे रविवारी श्रमदान
संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी येत्या रविवारी (दि. १६) महापालिकेच्या कन्या शाळेच्या मैदानावर सकाळी ९.३० वाजता श्रमदान करण्याचे ठरविले आहे. मैदानावर वाढलेल्या गवतामुळे त्यात सरपटणार्या प्राण्यांचे वास्तव्य असू शकते. ते विद्यार्थ्यांना घातक ठरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शाळेच्या आवारात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संघर्ष समितीच्या श्रमदानातून ते गवत मुळासहित उखडून काढले जाणार आहे. तसेच स्वखर्चाने ते गवत टेम्पोद्वारे वाहून नेवून त्याची खाडी किनारी विल्हेवाट लावली जाणार आहे, अशी माहिती संघर्षचे उपाध्यक्ष विजय काळे, माधुरी गोसावी, पराग बालड आदींनी दिली.