मनसेच्या तक्रारी नंतर महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीचे सानपाडा नवी मुंबई येथील महाविद्यालय बेकायदेशीर असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाकडे गेल्या आठवड्यात केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सानपाडा कॉलेज ऑफ फार्मसी विरोधात तंत्र शिक्षण संचालनालयाच्या मुंबई विभागीय सहसंचालक श्री.प्रमोद नाईक यांनी त्रीसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली आहे. या समिती मध्ये श्री.एस.बी.विश्वरूपे, विभाग प्रमुख विद्युत, शासकीय तंत्र निकेतन, मुंबई, डॉ.एम.डी.मेनन, प्राध्यापक, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, सांताक्रुज, श्री.एस.एस.मोतलिंग, अधिव्याख्याता, स्थापत्य, शासकीय तंत्र निकेतन, मुंबई यांची नेमणूक करण्यात आली आहे. या चौकशी समितीला सदर महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करून, तात्काळ आपला चौकशी अहवाल तंत्र शिक्षण संचालनालयाला सुपूर्द करायचा असल्याचे नवी मुंबई मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सदर शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय (अकरावी/बारावी) आणि पदवी महाविद्यालय, बी.फार्मसी आणि एम.फार्मसी, बी.एड. महाविद्यालय, विधी महाविद्यालय हे सर्व एक एकर जागेमध्ये (G+7) मजल्यांच्या एकाच इमारतीमध्ये सुरु आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक आहे. सदर महाविद्यालयात सेमीनार रूम, लेक्चर रूम, लायब्ररी, प्रयोगशाळा, संगणक रूम नियमानुसार नाही. तसेच सदर महाविद्यालयामध्ये निकषानुसार अध्यापक वर्ग/ कर्मचारी वर्ग नाही. महाविद्यालयात हेल्थ केअर सुविधा नाहीत, तसेच उपहारगृह सुद्धा महापालिकेच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करून सुरु केलेले आहे. जिमखानाच्या नावावर दोन कॅरम बोर्ड आणि एक तुटलेले टेबल टेनिस बोर्ड ठेवण्यात आल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यासंदर्भात आज नवी मुंबई मनसे व मनविसेच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठ कुलगुरू श्री.संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस येथे भेट घेतली. मुंबई विद्यापीठाने सुद्धा सदर महाविद्यालया विरोधात तात्काळ चौकशी समिती नेमावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंकडे याप्रसंगी केली. मनसेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीच्या सदर महाविद्यालया विरोधात चौकशी समिती नेमली जाईल असे आश्वासन मुंबई विद्यापीठ कुलगुरू श्री.संजय देशमुख यांनी दिले.
आज कुलगुरूंसोबत झालेल्या या बैठकीत मनसेच्या शिष्टमंडळात नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, मनविसे मुंबई विद्यापीठ उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, नवी मुंबई मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, मनविसे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर व मनसैनिक उपस्थित होते.