स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत व विनापरवानगी बाबींवर धडक कारवाई करण्यात येत असून आज महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे मार्गदर्शनानुसार बेलापूर विभागातील शहाबाज येथील बांधकाम सुरू असलेल्या 2 मजल्याचे बांधकाम झालेल्या, निवासी वापर नसलेल्या अनधिकृत इमारतीवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने निष्कासनाची धडक कारवाई केली.
प्रशांत जोशी व महेश कुंभार बांधत असलेल्या या इमारतीचे बांधकाम थांबविण्यासाठी बेलापूर विभाग कार्यालयामार्फत एम.आर.टी.पी. कायद्यातील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. अखेरीस आज अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण पथकाचे उपायुक्त अमरीश पटनिगेरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्रीम. प्रियंका काळसेकर व शाखा अभियंता प्रशांत पिंपळे यांनी जोरदार कारवाई करत सदर इमारतीवर निष्कासनाचा हातो़डा चालवला. या मोहीमेमध्ये 2 डंपर, 1 पोकलेन व 20 मजूरांसह बेलापूर विभागातील अधिकारी, कर्मचारी तैनात होते. 90 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी या मोहीमेमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी कार्यरत होते.