स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या उत्सवाची खाडीमध्ये मासेमारी करणारे नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजबांधव मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. आगरी-कोळी समान बांधवांइतकीच नवी मुंबईकरांना सारसोळे गावच्या ग्रामस्थांकडून साजर्या केल्या जाणार्या नारळी पौर्णिमेच्या उत्सवाची प्रतिक्षा असते. सारसोळे ग्रामस्थांच्या सहभागाने कोलवाणी माता मित्र मंडळाकडून काढण्यात येणारा पालखी सोहळा हा गेल्या काही वर्षापासून नवी मुंबईत बहूचर्चित बनला असुन या सोहळ्यात नवी मुंबईकरही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
सारसोळे-कोळीवाड्यातील कोलवाणी मातेच्या मंदिराचे दर्शन घेवून या पालखी सोहळ्यास सुरूवात होते. ही पालखी सारसोळे खाडीपर्यत जावून नंतर खाडीमध्ये नारळ समर्पित केला जातो. या सोहळ्यामध्ये सर्वपक्षीय राजकारणी, पक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रातील रथी-महारथी सहभागी होतात आणि भक्तीभावाने पालखीला आपला खांदाही लावतात.
या पालखी सोहळ्यात आगरी-कोळी समाजबांधवांची पारंपारिक गाणी-नृत्य हा उत्साह लक्षणीय असतो. या सोहळ्याचे चित्रिकरण करण्यासाठी अनेक वर्तमानपत्राचे छायाचित्रकारही आर्वजून गेल्या काही वर्षापासून हजेरी लावत असतात. गावातील युवक कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून पालखी सोहळा काढत असून हा सोहळा गेल्या काही वर्षापासून नवी मुंबईकरांमध्ये आकर्षणाचा व श्रध्देचा विषय बनला असल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी दिली.