स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
मुंबई महापालिका झाली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
मुंबई : मुंबई महानगर पालिका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून, बेकायदेशीर बांधकामामुळे घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळून 17 बळी जात असताना ‘पहारेकरी’ झोपले होते का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
घाटकोपर परिसरातील इमारत दुर्घटना प्रकरणी विधानसभेत मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते. बुधवारी सकाळी विखे पाटील यांनी या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधून स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. दुपारी या प्रस्तावावर बोलताना त्यांनी मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराचा कठोर शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत बेकायदेशीर कामांना संरक्षण देणारी आणि त्यातून मलिदा लाटणारी एक यंत्रणा राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या संगनमतातून तयार झाली आहे. त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव देऊन चुकवावी लागत आहे.
नवीन इमारतीचे बांधकाम मान्यता मिळालेल्या आराखड्यानुसार होते आहे की नाही, जुन्या इमारतींमध्ये बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम सुरू आहे का, हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी महापालिकेचे अधिकारी देखील जबाबदार आहेत. सदरहू इमारतीत बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सुनिल शितप प्रमाणेच अधिकाऱ्यांविरूद्धही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, घाटकोपरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांवर धाकदपटशा करून सुनिल शितपने बेकायदेशीर बांधकाम सुरू केले होते. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त होता, हे समोर आले पाहिजे. मुंबईच्या गल्लोगल्लीत असे सुनिल शितप निर्माण झाले असून, त्यांना पोसण्याचे काम महापालिकेत सुरू आहे. घाटकोपरच्या घटनेत जीव गमावणाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर शितपच्या मुजोरीला बळ देणारे खरे हात समोर आले पाहिजे. मुंबईकरांच्या हितासाठी महापालिकेची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ ‘पब्लिक लिमिटेड कंपनी’झाली पाहिजे, असेही राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.