स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
स्मशानासाठी वन विभागाकडून कायमस्वरुपी भूखंड मिळवण्याचे आ.नरेंद्र मेहता यांचे वचन
मेहतांच्या वचनामुळे वर्सोवा ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे
मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वर्सोवा गावातील जवळपास दीडशे आदिवासी कुटुंबांचा स्मशानभुमीसाठीचा इंग्रजांच्या काळापासून सुरु असलेला संघर्ष आता थाबणार आहे. या आदीवासी कुटुंबांच्या अंत्यसंस्कारासाठी वन विभागाकडून कायमस्वरुपी भूखंड मिळवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे वचन आ.नरेंद्र मेहता यांनी ग्रामस्थांना दिले. मेहता यांच्या आश्वासनामुळे वर्सोवा ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
वर्सोवा गावात तब्बल दीडशे आदिवासी कुटुंबांचे पुर्वापार वास्तव्य आहे. मात्र या गावातील आदिवासी कुटुंबांपैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी या समाजाला हक्काची स्मशानभुमीच उपलब्ध नाही. अगदी इंग्रजांच्या काळापासून या समाजातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार वन विभागाच्या जागेवर उरकावे लागत आहेत. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या या जागेवर कोणतीही शेड उभारण्याची परवानगी नसल्याने पावसाळ्यात मोठीच अडचण होते. गेली अनेक वर्षे यासाठी आदीवासींचा संघर्ष सुरू आहे. मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर या ग्रामस्थांनी आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाळण्याची घोषणा केली होती. या बाबीची गंभीर दखल घेत मेहता यांनी या ग्रामस्थांची मंगळवारी भेटघेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सातबाराच्या नोंदीमध्ये आदीवासींच्या स्मशानभुमीसाठी भूखंड राखीव असल्याची बाब ग्रामस्थांनी मेहता यांच्या निदर्शनास आणुन दिली. त्याअनुषंगाने वन विभागाकडे पाठपुरावा करून स्मशानासाठीची ही जागा मिळवून देण्याचा वचन मेहतांनी ग्रामस्थांना दिले. त्यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्याने अखेर ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतल्याची घोषणा केली.