उल्हासनगर : ठाण्यातील रिक्षाचालकाकडून महिलेच्या विनयभंगाचा प्रकार ताजा असतानाच आता उल्हासनगर शहरातही एका रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तात्काळ या आरोपी रिक्षाचालकला अटक केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प ३ येथे राहणारी ३१ वर्षीय महिला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अमन टॉकीज परिसरातील सारस्वत बँकेसमोरून रस्ता ओलांडून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या चंद्रकांत कटारे (३९) या रिक्षाचालकाने महिलेला पाहून रिक्षा थांबवली. त्याचवेळी त्याने रिक्षातून उतरून त्या महिलेची ओढणी ओढून तसेच विकृत हावभाव विनयभंग केला. महिलेने विरोध करताच रिक्षाचालक चंद्रकांत कटारे याने रिक्षा सुरू करत घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कल्याण येथील अशोकनगर, वालधुनी येथे राहणाऱ्या चंद्रकांत कटारे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपी चंद्रकांत कटारे याला अटक केली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक एम. जी. गायकर करत आहेत.