नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकामध्ये झोपलेल्या राष्ट्रवादीला महापालिकामधून हद्दपार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले. भाजपामध्ये काम करणारे कार्यकर्ते कधीच आपल्या नजरेतून सुटत नाहीत. चांगले काम केले तर महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ठामपणे सांगितले.
नवी मुंबई जिल्हा भाजपा युवा मोर्चा तर्फे आज 6 ऑगस्ट रोजी वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहमध्ये युवा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे बोलत होत्या.
नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळून नवी मुंबईचा महापौर भाजपाचाच होईल, आगामी निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात भाजपाचेच कमळ फुलेल, असा दावा भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि सुरु केलेल्या लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा, प्रभागांमध्ये चांगले काम करुन नावलौकिक कमवा, कोणाच्याही दबावाला घाबरु नका, बॅनर आणि होर्डींग बनविताना चुका करु नका, कार्यकर्ते गोळा करुन निवडणुकीची तयारी करा, स्वतःबरोबरच पक्षाची ताकद वाढवा, महापालिका मधील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा निर्धार करुन कामाला लागा, असा सल्लाही यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिला.ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा प्रचाराचा नारळ लवकरच फोडणार आहे, असेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी जाहीर केले. भाजपामध्ये प्रवेश करणार्या इतर पक्षीय कार्यकर्त्यांना भाजपामध्ये सन्मानाची वागूणक मिळेल, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आपणाकडे घेऊन येणार्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाहीही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
मेळाव्यात युवा सेनाचे नवी मुंबई जिल्हा समन्वयक संजय पवार, मनसेचे दीपक अनाजे, स्वाभिमानी संघटनाचे पियुष चोडणकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
नवी मुंबई महापालिका मध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महापालिका सभागृहातील शिवसेना नगरसेवक कमजोर आहेत. राष्ट्रवादी पोकळ झाली असून, काँग्रेस नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये लोळत आहे. राष्ट्रवादी आतून पोखरली आहे, अशी टिप्पणी मेळाव्यात नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केली. महापालिका सभागृहात केवळ भाजपा नगरसेवक नागरी प्रश्न सोडविण्यासाठी लढत आहेत. भाजपा सोडून इतर पक्षांमध्ये युवा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची हिम्मत नाही, असा दावाही घरत यांनी केला.
नवी मुंबईमध्ये भाजपा वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम आपण करीत असून, भाजपाबद्दल अपप्रचार करण्याचे काम विरोधक करीत आहेत, असे यावेळी घरत यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिका मधील सत्ताधारी भ्रष्टाचार्यांनो सिंहासन खाली करा, भाजपा येत आहे, असा इशारा यावेळी प्रदेश भाजप सचिव तथा नवा मुंबई प्रभारी संजय उपाध्याय यांनी दिला.
मेळाव्यात प्रास्ताविक नवी मुंबई जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी केले. युवा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यास ज्येष्ठ नेते मारुती भोईर, भगवानराव ढाकणे, नवी मुंबई जिल्हा भाजप महिला अध्यक्ष दुर्गाताई ढोक, माजी महापौर सुषमा दंडे, नवी मुंबई जिल्हा भाजप सरचिटणीस डॉ. राजेश पाटील, कृष्णा पाटील, विजय घाटे, निलेश म्हात्रे, नगरसेवक सुनिल पाटील,दिपकपवार, नगरसेविका सौ. दमयंती शेवाळे, सौ. उषाताई पाटील, माजी नगरसेवक संपत शेवाळे, काशिनाथ पाटील, विक्रमसिंह पराजुली, भाजप युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी हरिश पांडे, शशिकांत पांडे आदींसह हजारो युवक-युवती उपस्थित होते.