सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात मूषक नियत्रंण विभागात काम करणार्या कंत्राटी कामगारांची आजही आर्थिक ससेहोलपट सुरुच आहे. सप्टेंबर महिना संपत आला असला तरी या मूषक नियत्रंणच्या कामगारांना जुलै व ऑगस्ट महिन्याचा पगार मिळालेला नाही. दसरा अवघा चार दिवसावर आलेला असल्याने सण साजरा कसा करायचा अशी चिंता या मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून उघडपणे व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षापासून पालिकेच्या मूषक नियत्रंण विभागात काम करणार्या कंत्राटी कामगारांची वेतन विलंबाबाबत सुरू असलेली आर्थिक ससेहोलपट आजही कायम आहे. या कामगारांच्या वेतन विलंबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दोन महिन्यापूर्वी भीक मागो आंदोलन करून या कामगारांच्या वेतनासाठी निधी जमा करण्याचा इशारा दिला होता. तो इशारा दिल्यावर पालिका प्रशासनाकडून तात्काळ एक महिन्याचे वेतन मूषक नियत्रंणच्या कामगारांना देण्यात आले. पुन्हा त्यानंतर या कामगारांचे वेतन रखडलेच आहे. जुलै व ऑगस्टचे वेतन मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन रखडलेलेच आहे.
काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सुरज पाटील यांनीही मूषक नियत्रंण कामगारांच्या रखडलेल्या वेतनाविषयी पालिका प्रशासनाला निवेदन देत प्रशासनाला धारेवर धरले होते. टेंडरबाबत प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने मूषक नियत्रंण कामगारांच्या वेतनास विलंब होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
एकतर पगार जेमतेम, तोही वेळेवर होत नाही. घर चालवायचे कसे, जगायचे कसे, मुलांचे शिक्षण करायचे कसे असा संतप्त सवाल मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाच्या आमदार मंदाताई म्हात्रे पालिका समस्यांबाबत सतत महापालिका मुख्यालयात येत असून आपल्या समस्या निवारणासाठी आता त्यांनाच गळ घालणार असल्याचे काही मूषक नियत्रंण कामगारांनी यावेळी सांगितले.