घाटकोपर अंधेरी लिंक रोड येथील सावरकर नगर येथे गटाराचे झाकण गायब असल्याने स्थानिकांनीच सिमेंटच्या गोण्या टाकून केला तात्पुरता उपाय – छाया – निलेश मोरे
सावरकर नगर येथील गटारावरील झाकण गायब
निलेश मोरे
मुंबई : विरोधकांच्या रडारवर मुंबई महानगर पालिका नेहमीच टार्गेट होत असते. या महिन्यात तीन दिवस सतत पडणार्या मुसळधार पावसाने मुंबईत कहर केला होता. शहरामध्ये, उपनगरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. गटारे, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत होते. पावसाने मुंबईत केलेल्या कहरामध्ये मुंबई ठप्प झाली होती . ठिकठिकाणी गटारावरील झाकणे पाण्याच्या दबावाने वाहून गेल्याने मुंबई हॉस्पिटलचे प्रसिध्द डॉक्टर दीपक अमरापूरकर मृत्यूच्या जाळ्यात सापडले. डॉक्टरांची गाडी पाण्यात अडकल्याने डॉक्टर रस्त्यावरून चालत घरी जात असताना उघड्या गटारात पडून त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर मुंबई महापालिकेला विरोधकांनी घेरले. विरोधकांच्या विरोधानंतर पालिकेला जाग येईल असे वाटत असताना घाटकोपर अंधेरी लिंक रोड येथील सावरकर नगर येथील गटारावरील परिस्थिती पाहिली तर पालिका अजूनही झोपलेलीच वाटते.
सावरकर नगर येथील गटाराचे झाकण गेल्या आठवड्यापासून गायब झाले आहे. या मुख्य रस्त्यावर पावसात गुडघाभर पाणी साचते. या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने वाहतूक कोंडी देखील होत असते. रात्रीच्या वेळेस या रस्त्यावरून स्थानिकांना चालणे खूप कठीण होते . येथील स्थानिक रहिवाशी भास्कर बोडके यांनी काही स्थानिकांना हाताशी घेऊन या गटारावर काठ्या आणि सिमेंटच्या गोण्या टाकून या गटारावर तात्पुरता उपाय जरी केला असला तरी पालिकेने लक्ष देऊन त्यावर लोखंडी झाकण बसवायला हवे, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे .