नवी मुंबई : फिफा 17 वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धा 6 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत नवी मुंबईत संपन्न होत असून यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन कार्यक्रम राबविण्यात येत असून स्पर्धा सुरळीत पार पा़ण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली गठीत पर्यवेक्षण व सहनियंत्रण समितीची बैठक आज महापालिका मुख्यालयात पार पडली त्यामध्ये स्पर्धेच्या अनुषंगाने झालेल्या व करावयाच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व शिक्षण विभागाचे उपसचिव श्री. राजेंद्र पवार, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, उपआयुक्त प्रशासन किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, सहा. संचालक नगररचना ओवैस मोमीन, वाहतुक पोलीस उप आयुक्त नितीन पवार, शहर अभियंता मोहन डगांवकर, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 1 व 2 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगिरे, सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे प्रमुख संदिप संगवे, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियम, फिफा यांचे उच्च अधिकारी व महापालिका अधिकारी उपस्थित होते.
स्पर्धा आयोजनातील महत्वाच्या कायदा व सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता व प्रसाधनगृहे, सराव मैदाने, रस्ते दुरुस्ती व सुशोभिकरण, विद्युत व्यवस्था, वाहन व्यवस्था अशा अनुषांगिक बाबींचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. जागतिक स्तरावरील ही फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशापरदेशातून प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या वाहनांचे पार्किंग नियोजन तसेच पार्किंगच्या ठिकाणाहून स्टेडियमपर्यंत पोहचण्यासाठी बसेस व्यवस्था करणे व पार्किंग व्यवस्थेबाबत माहिती देणारे फलक तातडीने लावणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.
गणपतशेठ तांडेल मैदान करावे, ग्रॅंड सेंट्रल पार्किंग एल ॲण्ड टी सिवूड, रहेजा कंस्ट्रक्शन साईट शिरवणे एम.आय.डी.सी., प्लॉट नं. 8 ए, 8 बी, 13 बी उरण फाटा तसेच लिटिल वंडर मॉल खारघर, वंडर्सपार्क सेक्टर 19 ए नेरूळ याठिकाणी साधारणत: 13 हजार वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच त्याठिकाणाहून स्टेडियम पर्यंत जाण्यासाठी एन.एम.एम.टी. उपक्रमाच्या वातानुकुलीत व सर्वसाधारण बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबतचा पार्किंग प्लान पोलीस विभागाकडून नागरिकांच्या माहितीसाठी लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.
नवी मुंबई हे राज्यात सर्वप्रथम व देशात आठव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकित असून फिफा वर्ल्डकपच्या निमित्ताने देशापरदेशातून येणा-या प्रेक्षकांना व फुटबॉल खेळाडूंना नवी मुंबई शहराची चांगली प्रतिमा दिसावी व यातून शहराचा पर्यायाने राज्याचा व देशाचा नावलौकीक उंचवावा हा आपल्या सर्वांचाच प्रयत्न असून सर्व प्राधिकरणांच्या एकत्रित सहयोगाने या स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ नवी मुंबई मिशनचा संदेशही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याप्रसंगी दिली. फिफाच्या माध्यमातून खेळातून आरोग्याचा संदेश तसेच त्यासोबतच स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणारी “वॉकेथॉन” या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्तांनी याप्रसंगी सांगितले.