स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई ़: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बोनकोडे प्रभाग ५५ चे नगरसेवक मुनवर पटेल यांच्या प्रयत्नाने स्थानिक परिसरातील २२२ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच आणखी ८७ ज्येष्ठांना ही कार्ड देण्यात येणार आहे. नगरसेवक मुनवर पटेल यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना ही कार्ड वितरीत करण्यात आली आहेत.
महापालिका सभागृहातील एक युवा नगरसेवक असणार्या मुनवर पटेल यांनी सामाजिक बांधिलकीशी समर्पित होत सातत्याने प्रभागात विविध उपक्रम राबविण्याला चालना दिलेली आहे. प्रभागात स्वच्छतेला प्राधान्य देताना काही दिवसापूर्वीच शरीर स्वास्थ्यासाठी परिसरातील नागरिकांसाठी ओपन जीमही नगरसेवक मुनवर पटेल यांनी सुरू करून दिली आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार शासकीय सवलती मिळणे आवश्यक असतानाही केवळ ज्येष्ठ नागरिक कार्ड नसल्याने संबधित लोक सुविधांपासून वंचित राहत होते. ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेवून तसेच त्यांना वयोमानानुसार धावपळ करणे शक्य नसल्याने नगरसेवक मुनवर पटेल यांनी प्रशासन दरबारी धावपळ करून ज्येष्ठ नागरिकांना ही कार्ड उपलब्ध करून दिली. ज्येष्ठ नागरिकांनी आपला युवा नगरसेवक मुनवर पटेल यांचे आभार मानत यापुढील काळातही त्यांनी ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याकरिता अधिकाधिक योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.