नवी मुंबई :- नवी मुंबईतील दिघा-यादवनगर भागातील पाच महिन्याच्या गर्भवती महिलेचा खून अखेर तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
ममता अखिलेश गुप्ता (२४) ही तिच्या पतीसमवेत अखिलेश गुप्ता (२८) दिघा-यादवनगर भागात राहात होती. या दोघांना दीड वर्षाची मुलगी आहे. सोमवारी सकाळी अखिलेश याने आपल्या पत्नीचा खून झाल्याचे पोलिसांना कळविले होेते. आपण काही काळासाठी बाहेर गेलो असून घरी आलो असता घराचा पुढचा दरवाजा उघडला नाही म्हणून मागच्या दरवाजाने घरात गेलो असता पत्नीचा कोणीतरी गळा चिरून खून केल्याचे दिसून आल्याचे अखिलेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याबाबत शेजार्यांकडे चौकशी केली असता, पती-पत्नीत नेहमीच भांडणे होत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी आज अखिलेशला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांने आपण चाकूने पत्नीचा खून केल्याची कबूली दिली. अखिलेशचे बाहेर अनैतिक संबंध असून त्यातूनच पती-पत्नीत भांडणे होत असायची आणि यातून अखिलेशने पत्नीचा खून केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.