नवी मुंबई :- महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यावर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत असून आज शहाबाज येथील महेश कुंभार यांच्या दोन मजली अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.
सदर बांधकामास महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आली होती. त्या विरोधात संबंधितांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर निकाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने लागल्याने अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांनी विभागातील सहकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहयोगाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत 1 डंपर, 1 पोकलेन, 1 टोईंग, व्हॅन, गॅसकटर, ब्रेकर हे साहित्य वापरण्यात आले. 25 कामगारांच्या मार्फत राबविण्यात आलेल्या या निष्कासन मोहिमेप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी स्थानिक तसेच महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते.
अशाच प्रकारची कारवाई वाशी विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके यांच्या मार्फत सेक्टर 12, वाशी येथील सुरू होण्याच्या तयारीत असलेल्या हॉटेल ग्रिप्सिलच्या मार्जिनल स्पेसवर करण्यात आली व निष्कासन करण्यात आले.