** आ.संदीप नाईक यांची मागणी महावितरणकडून मान्य ** नवी मुंबईकर वीज ग्राहकांना दिलासा
नवी मुंबई :- नवी मुंबई शहरातील आणि खासकरुन कोपरखैरणे नोडमधील नागरिकांना महावितरणने वीजबीलात आकारलेली अन्यायकारण समायोजित रक्कम रदद करण्यात येणार आहे. आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी महावितरणच्या अधिकार्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत ही रक्कम घेण्यात येवू नये, अशी मागणी केली होती. ती मंजुर झाल्याने सुमारे १२०० ते १५०० वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील सहा महिन्यात जर समायोजित वीजबीलांचा शॉक ग्राहकांना दिला तर मात्र लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा शॉक देवू, असा खणखणीत इशारा देखील आमदार नाईक यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिला आहे.
विविध वीज विषयक प्रश्नांवर महावितरणचे मुख्य अभियंता चंद्रशेखर मानकर यांची आमदार नाईक यांनी लोकप्रतिनिधी, वीज ग्राहक यांच्या समवेत भेट घेतली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सूतार, नगरसेवक घनश्याम मढवी, नगरसेवक लिलाधर नाईक, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, नगरसेविका उषा भोईर, नगरसेविका सायली शिंदे, कोपरखैरणे प्रभाग समितीचे सदस्य डॉ.प्रतिक तांबे आणि मारुती सकपाळ, समाजसेवक नारायण शिंदे, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
महावितरण कंपनीकडून प्रथम रोलेक्स कंपनीचे मिटर बसविण्यात आले. ते फॉल्टी निघाल्याने नंतर एल ऍन्ड टी कंपनीचे मिटर बसविले. मात्र रोलेक्सचे मिटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून महावितरणने नागरिकांना सरासरी बीले धाडली. ज्या ग्राहकांना पूर्वी ७०० ते ८०० रुपये बीले येत असत त्या ग्राहकांना ४ हजार ते १२ हजारांच्या घरात बीले येवू लागली. त्यामुळे फॉल्टी मिटर ही शासनाची जबाबदारी आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांना कशाला? असा सवाल उपस्थित करीत आमदार नाईक यांनी समायोजित रक्कम रदद करण्याची मागणी केली. ती मुख्य अभियंता मानकार यांनी मान्य केली.
घनसोली, तळवली, गोठीवली, रबाळे, अर्जुनबुवावाडी या भागात पावसाळयात वीज समस्या गंभीर होतात. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली असता या भागात सुरळीत वीजपुरवठयासाठी केबल टाकण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता मानकर यांनी दिली. कोपरी विभागात वीजेच्या केबल टाकण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोणातून वीज दुरुस्ती, देखभाल तसेच केबल टाकण्यासाठी खोदकाम आणि इतर कामांसाठी नवी मुंबई पालिकेच्या वतीने ज्या परवानग्या हव्या आहेत, त्या मिळवून देण्यासाठी महापौर, पालिका आयुक्त, शहर अभियंता आणि महावितरणचे अधिकारी यांची बैठक आयोजित करुन समन्वय साधला जाईल, अशी ग्वाही आमदार नाईक यांनी बैठकीत दिली.
झपाटयाने विकसीत होणार्या घणसोली नोडमधील प्रलंबित वीज कामांचा विषय आमदार नाईक यांनी उपस्थित केला असता या नोडमध्ये ८० लाखांच्या कामांची निविदा मंजुर करण्यात आली असल्याची माहिती मुख्य अभियंता मानकर यांनी दिली. या अंतर्गत नविन केबल टाकणे, डी.पी. बॉक्स बसविणे इत्यादी कामांचा समावेश आहे. त्याच बरोबर नोसिल-घणसोली सब स्टेशनच्या कामासाठी जागा निश्चत करण्यात आली असून त्या ठिकाणी देखील लवकरच काम सुरु करणार असल्याचे मुख्य अभियंता मानकर यांनी आमदार नाईक यांना सांगितले.