* ५०० मुलामुलींसाठी जेवणाची व राहण्याची केली व्यवस्था * ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची होत होती गैरसोय
दीपक देशमुख
नवी मुंबई :- ११ एप्रिल रोजी सकाळी पोलीस भरतीची लेखी परीक्षा असल्यामुळे राज्य भरातील ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी एक दिवस अगोदरच येऊन नेरूळ येथील डी.वाय.पाटील स्टेडीयम बाहेरील रस्त्यावर आपले बस्तान बसविले होते. इथे या मुलांसाठी राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयाची कोणतीही सुविधा नव्हती. ही बाब कळताच मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या समवेत मनसैनिकांनी या ठिकाणी धाव घेतली व मुलांना मदत केली.
ग्रामीण भागातून पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विविध भागातून शेकडो मुले या ठिकाणी आली होती. यात मुलींचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे मनसेकडून मुलींची रात्री राहण्याची व्यवस्था नेरूळ येथील आश्रय हॉल येथे तर मुलांसाठी फ्रुटवाले भवन हॉल येथे रात्री राहण्याची व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी या सर्व मुलांना जेवण तसेच पिण्याचे पाणी सुद्धा मनसेकडून उपलब्ध करून देण्यात आले.
दादा तुम्ही आमची आई-बाबांप्रमाणे काळजी घेतली अशी भावना याप्रसंगी या मुलामुलींनी मनसैनिकांप्रति व्यक्त केली. तर हा क्षण आम्हाला आंतरिक समाधान देणारा होता अशी भावना मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे.
तसेच नवी मुंबईत सिडको व राज्य सरकारने तात्काळ “महाराष्ट्र भवन” बांधावे हा अट्टहास कालच्या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र भवनचा लढा मनसे आणखी तीव्र करणार असून १ मे ला स्वतः मनसे महाराष्ट्र भवनच्या भूखंडावर भूमिपूजन करणार असल्याचा पुनरुच्चार गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
याप्रसंगी या संपूर्ण मदत कार्यात मनसैनिक सविनय म्हात्रे, अप्पासाहेब कोठुळे, विनय कांबळे, अभिजित देसाई, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, श्रीकांत माने, सुहास मिंडे, स्वप्नील गाडगे, अजय सुपेकर, निखील गावडे, योगेश कुंभार, गजानन ठेंग, संजय सुतार, विनायक पिंगळे, भूषण बारवे, प्रीतम गायकवाड, देवा प्रसाद, अनिकेत बांगर, भूषण पाटील, अमित पवार, विकास बोंबे, वैभव बारवे, ज्ञानेश्वर निकम, विशू सुधाला व मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी होते.