मुंबई :- भारतीयांना असलेली सोन्याची आवड ही जगजाहिर बाब आहे. दिवाळी-दसरा असो, अक्षयतृतीया असो, लगीन सराई असो, सोन्याच्या भावाने कितीही गगनभरारी मारली तरी भारतीय सोने खरेदी करण्याचा मोह आवरता घेत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या खरेदीची उलाढाल मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होतच असते. नोटबंदी, जीएसटी तसेच एटीएममध्ये असलेला पैशांचा खडखडाट यावर सर्व प्रतिकूलतेवर मात करत भारतीयांनी अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव ३१५०० प्रती १० ग्रॅमवर जावूनही सोन्याची मोठ्या प्रमाणावर उलाढाल झालेली बुधवारी पहावयास मिळाली.
मौल्यवान धातू खरेदीसाठी असलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी बुधवारच्या अक्षय्य तृतीयेला शहरात सोने खरेदीदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले. सोन्याचा दर बुधवारी सकाळपासून जसजसा वाढत होता, तशी सराफ पेढय़ांमधील ग्राहकांची पावले गर्दी करत असल्याचे चित्र होते.
मुंबईच्या सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून स्टॅण्डर्ड सोन्याचा भाव वाढत आहे. बुधवारीही सोने तसेच चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदली गेली. सोन्याचा तोळ्याचा भाव आता ३१,५०० पर्यंत, तर चांदीचा किलोचा दर ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. असे असूनही गुंतवणूक म्हणून या पर्यायाकडे खरेदीदार वळल्याचे दिसून आले. तसेच लग्न आदी समारंभाच्या निमित्ताने होणारी मौल्यवान धातूच्या दागिन्यांच्या खरेदीचे सत्र या मुहूर्तावर सुरू झाल्याचे मानले जात आहे.
विद्यमान अक्षय्य तृतीयेनजीक असलेले मौल्यवान धातूचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोने खरेदी अधिक झाल्याचा दावा सराफ व्यावसायिकांनी केला आहे. सोन्याची नाणी, वळे आदींबरोबरच दागिन्यांसाठी खरेदीदारांकडून मागणी नोंदली गेल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून मौल्यवान धातूची मागणी ओसरल्याने दरांची चकाकीही लुप्त पावली होती. ती आता पुन्हा वाढणार असून सोन्याचे दर वर्षभरात तोळ्यासाठी ३४ हजार रुपयांपर्यंत जातील, असे पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. ‘व्हीएचपी ज्वेलर्स’चे संचालक आदित्य पेठे यांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या अक्षय्य तृतीयेला ग्राहकांकडून अधिक मागणी नोंदली गेली असून विक्रीही २० टक्क्यांपर्यंत गेली आहे. मौल्यवान धातूंच्या किमती वाढूनही ग्राहकांचा खरेदीकल कायम असेल, असेही ते म्हणाले.
अक्षय्य तृतीयेसाठी सराफ पेढय़ांनी विविध सूट-सवलतीही दिल्या. पेटीएम गोल्डने सोने खरेदीवर लागणाऱ्या वस्तू व सेवा कराच्या मूल्यातील अतिरिक्त सोने विनामूल्य देण्याची सुविधा दिली. तसेच सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकाला तासाला पाचपटपर्यंत सोने जिंकण्याची संधी दिली. कंपनीची ही योजना बुधवारसाठीच लागू होती. फोनपेनेही २४ कॅरेट सोने खरेदीसाठी ५,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक देऊ केले.