ओएनजीसीने दिले उपोषणकर्त्यांना लेखी पत्र
पनवेल :- काळुंद्रे-भिंगार प्रकल्पग्रस्त संघटना आणि पनवेल संघर्ष समितीच्या रेट्यामुळे अखेर ओएनजीसी प्रशासनाला नाक झुकवावे लागले. आज, उपोषणाच्या दुसर्यांदिवशीच ओएनजीसी प्रकल्प अधिकार्यांनी, स्थानिकांच्या 24 मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया 15 दिवसाच्या आत पूर्ण करू, असे लेखी पत्र आर. डी. घरत आणि कांतीलाल कडू यांच्याकडे स्वाधीन केले. त्यावेळी शेकापचे माजी आ. विवेक पाटील, आ. बाळाराम पाटील उपस्थित होते. तत्पूर्वी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी, कडू यांनी यापूर्वीच दिलेल्या माहितीवरून पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले.
ओएनसीजी प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्याने स्थाानिकांमध्ये प्रचंड उद्रेक खदखदत होता. त्यातच यंदा प्रथमच 24 मुलांना इयत्ता पहिलाच्या प्रवेशापासून रोखण्यासाठी षढ्यंत्र रचल्याने स्थानिक, प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला धडा शिकविण्याचे ठरविले होते. त्यामुळे काळुंद्रे-भिंगारी प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे अध्यक्ष आर. डी. घरत आणि पदाधिकार्यांनी कांतीलाल कडू यांना नेतृत्व करण्यास सांगितले. त्यानुसार प्रशासनाला वठणीवर आणण्याकरीता बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, प्रशासन आणि केंद्रीय विद्यालयाच्या समितीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कडू यांच्याशी चर्चा करून आर. डी. घरत यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. त्याला पनवेल संघर्ष समितीने जाहिर पाठिंबा देवून खिंडही लढवली. कडू यांच्या अभ्यासूपणा आणि आक्रमकतेला ग्रामस्थांनी प्रांजळपणे दाद दिल्यानेच हे आंदोलन यशस्वी होऊ शकले असे घरत यांनी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे सांगितले.
दरम्यान, दुपारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बसराज लोहारे यांनी घरत यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना तात्काळ हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पोलिसांनी मोठा फौजफाटा लावून घरत यांना उचलण्याची तयारी सुरू करताच स्थानिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. आतापर्यंत परिस्थिती आणि वातावरण शांत असून प्रशासनाने तो चिघळवू नये, अशा शब्दात ठणकावल्याने घरत यांची हास्पीटल वारी टळली.
15 दिवसात ओएनजीसी प्रशासनाने लेखी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशा इशारा कांतीलाल कडू यांनी दिला. शेवटी सर्वांचे आभार दिलीप परदेशी यांनी मानले.
दिलीप परदेशी, श्याम मढवी, संजय परदेशी, बी. आर. परदेशी, नंदू घरत, महेश गिरी, प्रकाश मढवी, किरण म्हात्रे, शक्ती मढवी, नवनाथ मांगरूळकर, संजय चिखलेकर, श्याम परदेशी, सचिन परदेशी, केशव घरत, दीपक शिंदे, रामदास मढवी, रवी गायकवाड, दिलीप परदेशी, मयुर परेदशी, सुरज परदेशी आदींनी उपोषणात सहभाग घेतला आहे.
मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक रमेश गुडेकर, विजय पाटील व सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते येत्या आठवड्यात नवी दिल्ली येथील संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक घेवून प्रकल्पग्रस्तांसोबत त्यांच्या व्यथा मांडणार आहेत.
शिष्टमंडळाला घेवून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊ
ओएनजीसी प्रकल्पाधिकार्यांनी लेखी पत्र दिल्यानंतरही स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांचे मागचे अनुभव पाहता विश्वास राहिलेला नाही, हे जरी खरे असले तरी या पत्राची ते नक्कीच अंमलबजावणी करतील, असा विश्वास व्यक्त करताना पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान आणि मानव विकास खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांची शिष्टमंडळासह येत्या आठवड्यात नवी दिल्लीत भेट घेवू.
-कांतीलाल कडू
(अध्यक्ष, पनवेल संघर्ष समिती)