लंडन :- जो रूटचे शानदार शतक आणि लिअॅम प्लंकेटच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने शनिवारी वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतावर ८६ धावांनी मात केली. इंग्लंडच्या ७ बाद ३२२ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २३६ धावांत संपुष्टात आला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
लॉर्ड्सवर रंगलेल्या या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या सलामी जोडीने इंग्लंडला ६९ धावांची सलामी दिली. यानंतर रूट आणि मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. मॉर्गनने ५१ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह ५३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये रूटने डेव्हिड विलीच्या साथीने फटकेबाजी करून संघाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. यादरम्यान, रूटने वन-डे कारकिर्दीतील बाराव्या शतकाला गवसणी घातली. डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झालेल्या रूटने ११६ चेंडूंमध्ये ८ चौकार व एका षटकारासह ११३ धावा फटकावल्या. विली ३१ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला. कुलदीपने ६८ धावा देत ३ विकेट घेतल्या.
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या १५ धावा करू शकला, तर धवन ३६ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरील लोकेश राहुलला भोपळाही फोडता आला नाही. अकराव्या षटकामध्ये भारताची अवस्था ३ बाद ६० अशी होती. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचून डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हे दोघे बाद झाल्यानंतर पुन्हा भारताचा डाव घसरला. कोहलीने ४५, तर रैनाने ४६ धावा केल्या. प्लंकेटने ४६ धावांत भारताचे चार फलंदाज गारद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड – ७ बाद ३२२ (जो रूट १३३, डेव्हिड विली नाबाद ५०, इऑन मॉर्गन ५३, कुलदीप यादव १०-०-६८-३, युझवेंद्र चहल १०-०-६८-३) विजयी वि. भारत – ५० षटकांत सर्वबाद २३६ (विराट कोहली ४५, सुरेश रैना ४६, महेंद्रसिंह धोनी ३७, शिखर धवन ३६, लिअॅम प्लंकेट १०-१-४६-४, आदिल रशीद १०-०-३८-२).
धोनी दसहजारी मनसबदार
या सामन्यात ३७ धावा करून महेंद्रसिंह धोनीने वन-डे कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १२ वा फलंदाज ठरला आहे. धोनीने आता ३२० सामन्यांमध्ये १०,००४ धावा केल्या असून सर्वांत कमी डावांत हा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने २७३ डावांमध्ये ही कामगिरी केली.