नवी मुंबई :- नवी मुंबईत सुमारे 378 इमारतींना महापालिकेकडून धोकादायक म्हणून जाहीर केले असताना प्रशासनाने आपली जबाबदारी झटकत या रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरासारखी महत्वाची गरज अपूर्ण ठेवली आहे. सदर धोकादायक इमारतींमधून हजारो नागरिक राहत असून नवी मुंबईत एकही संक्रमण शिबीर नसल्याने बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात नवी मुंबईत संक्रमण शिबिराकरीता औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, सिडकोने 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती निकृष्ट दर्जाच्या ठरू लागल्या असून त्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न गेली 20 वर्षे प्रलंबित आहे. नवी मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या प्रत्येक वर्षी वाढत असताना प्रशासनाने बांधलेल्या संक्रमण शिबिराचा प्रस्ताव सत्ताधारी पक्ष विनाकारण स्थगित ठेवत आहेत. नवी मुंबईत यंदा 378 इमारती धोकादायक व 58 इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या असून पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास रहिवाशांसाठी संक्रमण शिबीर बांधण्याची परवानगी देणारा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. परंतु महापालिकेतील सत्ताधारी विनाकारण विरोध करीत नागरिकांना वेठीस धरत आहेत. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना राहत्या घराजवळच पर्यायी व्यवस्था हवी असल्याने नोकरी, मुलांची शाळा-महाविद्यालयांसाठी हे रहिवाशी धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास तयार होत नाहीत. नवी मुंबईत एकही संक्रमण शिबीर नसल्याने संक्रमण शिबिरांची गरज भासत आहे. ती व्यवस्था न झाल्यास इमारत दुर्घटनेत अपघातग्रस्त रहिवासी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत संक्रमण शिबीर उभारावे तसेच जर एखादी दुर्घटना झाल्यास ज्या सत्ताधाऱ्यांनी सदर संक्रमण शिबिरांना विरोध केला आहे,अशांवर कारवाईची मागणी केली असल्याचेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.