लॉर्ड्स : यजमान इंग्लंडने दुस-या कसोटीत भारताचा एक डाव 159 धावांनी पराभव करुन 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात अवघ्या 107 धावांत गारद झालेल्या भारतीय संघाची फलंदाजी अँडरसन आणि ब्रॉड यांच्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या डावातही कोलमडली. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर एकाही फलंदाजाला टिकाव धरता न आल्याने भारताचा डाव अवघ्या 130 धावांत आटोपला.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 289 धावांची आघाडी भरून काढताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मुरली विजय पुन्हा एकदा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी अपयशाचा पाढा पुन्हा गिरवल्याने सर्व जबाबदारी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर आली होती. मात्र, विराट कोहली सुद्धा जास्त काळ मैदानात टिकू शकला नाही. त्यानंतर आलेल्या फलंदाज सुद्धा लवकर तंबूत परतले. इंग्लंडचे गालंदाज जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजी कोलमडली. सलामीवीर मुरली विजय भोपळा न फोडता माघारी परतला. त्याला बाद करून जेम्स अँडरसनने लॉर्ड्सवरील विकेटचे शतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ राहुल (10) हाही अँडरसनचा शिकार बनला. पुजारा व रहाणे खेळपट्टीवर अधिक काळ टिकून राहिले, परंतु त्याचे रूपांतर त्यांना धावांमध्ये करता आले नाही. पुजारा ( 17) आणि रहाणे (13) यांना स्टुअर्ट ब्रॉडने माघारी धाडले. पाठीच्या दुखण्यामुळे कोहली पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
इंग्लंडने दुस-या कसोटीत पहिल्या डावात 289 धावांची आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावातील 107 धावांच्या प्रत्युत्तरात यजमानांनी 7 बाद 396 धावांवर डाव घोषित केला. सॅम कुरनला ( 40) हार्दिक पांड्याने बाद करताचा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने डाव घोषित केला. ख्रिस वोक्स 137 धावांवर नाबाद राहिला.