नवी मुंबई:- नवी मुंबई तुर्भे येथे डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात येणाऱ्या भूखंडावर राहत असलेल्या हजारो नागरिकांच्या झोपड्यांना देण्यात आलेल्या नोटीसीसंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, विकास पाटील उपस्थित होते. नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी तुर्भे हनुमान नगरमधील जुन्या झोपड्या हटविण्यासाठी नोटीसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या विस्तारित कचराभूमीच्या काही पाच ते सहा हेक्टर जागेवर गेली 40 वर्षे वास्तव्य असलेल्या तुर्भे येथील सुमारे दहा हजार रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. महसूल विभागाची 34 एकर जमीन पालिकेच्या विस्तारित कचरा भूमीला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. सदर जागा देताना शासनानेमहसूल व वनविभाग कडून सदर डम्पिंग ग्राउंड करिता मौजे तुर्भे, ता.जि.ठाणे येथील गट नं.376 मधील 18 एकर क्षेत्र, गट नं.377 मधील3.75 एकर क्षेत्र, गट नं.378 मधील 12.25 एकर क्षेत्र अशा एकूण 34 एकर क्षेत्राचा नवी मुंबई महानगरपालिकेस ताबा देण्याची शासन मान्यता देण्यात आली होती. परंतु सदर जागेवर हनुमान नगर येथील सुमारे 10 हजार नागरिक गेल्या 40 वर्षापासून राहत असल्याने तसेच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या घरांना संरक्षण देण्याचे जाहीर केल्याने येथील एकाही घरावर कारवाई न करता दिलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्या व सदर झोपडपट्टी धारकांना न्याय द्यावा अशी मागणी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, अनेक वर्षापासून रेंगाळत असलेला तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न व तेथील रहिवाशांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ यामुळे प्रशासनाने सदर डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलविण्याकरिता कार्यवाही केली. सदर जागा देताना शासनाने महसूल व वनविभाग कडून सदर डम्पिंग ग्राउंड करिता मौजे तुर्भे, ता.जि.ठाणे येथील गट नं.376 मधील 18 एकर क्षेत्र, गट नं.377 मधील 3.75 एकर क्षेत्र, गट नं.378 मधील 12.25 एकर क्षेत्र अशा एकूण 34 एकर क्षेत्राचा नवी मुंबई महानगरपालिकेस ताबा देण्याची शासन मान्यता देण्यात आली. परंतु तेथील स्थानिक नगरसेवक यांना सदर भूखंडाबाबत तसेच सदर भूखंडावर हजारो नागरिक वास्तव्य करीत असल्याचे माहित असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक तुर्भे डम्पिंग ग्राउंड करिता सदर भूखंड सूचित केला होता. त्यामुळे तुर्भे येथील हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या या स्थानिक नगरसेवकांनी चालविले आहे. सदर जमिनीवर पूर्वीपासून दगडखाणीचा व्यवसाय होता व शासकीय निर्णयानुसार हा दगडखाणीचा व्यवसाय गेल्या काही वर्षापासून बंद आहे. सदर व्यवसायाअंतर्गत काम करणाऱ्या व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर लहान-सहान कामांमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांनी सदर जमिनीवर सन 1995 पूर्वीपासून झोपड्या बांधून स्वत:च्या निवाऱ्याची सोय केली होती. सदर जमीन हि माझे विधानसभा क्षेत्रात येत असल्याने याबाबत सदर जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या झोपडपट्टीधारकांनी माझे कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची बाजू माझ्यासमोर मांडली. सदर बाबींची चौकशी केली असता आजतागायत ते तेथे राहत असून बहुतांशी झोपडपट्टीधारकांकडे तसे वास्तव्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. तसेच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांनी 31 डिसेंबर 2015 पूर्वीची घरे नियमित करण्याचे धोरण अवलंबले आहे. शासकीय धोरणानुसार सदर झोपडीधारक संरक्षणास पात्र असल्याचे दिसून येते. सदर प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित हावा ही माझीही इच्छा आहे परंतु त्याचबरोबर सदर ठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा मागे घेण्यात येऊन या गोर गरीब जनतेला न्याय देण्यात यावा, अशी मागणी ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांना केली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सदर झोपडपट्टी धारकांवर कारवाई करण्यात येणार नाही असे सूचित केले असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.