अभिनेत्री तनुश्री दत्ताने मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केलेत. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात सापडले. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आज 8 आॅक्टोबर रोजी नाना माध्यमांसमोर येऊन या आरोपांबाबत स्पष्टीकरणदेणार होते. मात्र आज नियोजित पत्रकार परिषद नाना यांनी ऐनवेळी रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाना जोधपुरमध्ये हाऊसफुल्ल-४ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी होते. त्याच सिनेमाचं शुटिंग आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या नाना पाटेकर यांना माध्यम प्रतिनिधींनी जोधपूर विमानतळावर गाठलं. पत्रकारांनी नाना यांना तनुश्रीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारत त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नाना पाटेकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. जे खोटं आहे ते खोटं आहे इतके बोलुन नाना तेथुन निघून गेले होते.