आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश, लवकरच होणार भूमिपूजन
नवी मुंबई :- नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी मुंबईमध्ये ओल्ड एज होम उभारणेकरिता भूखंड उपलब्ध करणेसंदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सिडको तसेच नवी मुंबई महापालिकेला सतत साकडे घातले होते. सिडको व महापालिकेनेही सदरसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती. नवी मुंबईतील जेष्ठ नागरिकांचा मोठा मेळावा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे घेतला होता. तसेच औचित्याच्या मुद्द्याद्वारे अधिवेशनात सभागृहाचे लक्षही वेधण्यात आले होते. नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी मुंबईमध्ये ओल्ड एज होम उभारणेकरिता भूखंड उपलब्ध करणेसंदर्भात सिडकोकडे मागणी केली होती. सिडकोनेही जेष्ठ नागरिकांकरिता भूखंड देणार असल्याचे सांगितले. सदर भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केल्यास महापालिकेनेही जेष्ठांसाठी ओल्ड एज होम बांधण्यास तयारी दर्शविली होती. सदरबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने सीवूड्स से-38 येथे भूखंड क्र. 13 हा 850 चौ.मी. चा भूखंड जेष्ठ नागरिकांच्या ओल्ड एज होम करिता आज दि. 22.10.2018 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आला.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, वयोवृद्ध दाम्पत्यांकडून इच्छामरणाच्या मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सर्वोच्च न्यायालयानेही इच्छामरणाला सशर्त मान्यता दिली असल्याने इच्छामृत्युचे प्रमाण वाढले आहे. विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असून ज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आई-वडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली असून मुला-मुलींनाही स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांना ओल्ड एज होम मध्येपाठविण्याचा विचार वाढायला लागला आहे. नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा ज्येष्ठांना आधार देण्याची गरज आहे. त्यांच्यावर इच्छामरण मागण्याची वेळ येऊ नये याकरिता नवी मुंबईमध्येही ओल्ड एज होम उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबईमध्ये ओल्ड एज होम उभारल्यास इच्छामरण मागण्यांही कमी होतील व असे ज्येष्ठ वयोवृद्ध एक चांगल्या आशेने जगतील म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे. महापालिका बांधून देण्यास तयार आहे परंतु माझ्या आमदार निधीमधूनही रु. 50 लाखाची तरतूद मी करण्यात आहे. आज जेष्ठांकरिता भूखंड मिळाल्याचे पत्र पाहून आनंद वाटत असल्याचे तसेच नवी मुंबईतील जेष्ठांचा उत्साह व जल्लोष पाहून मन भरून येत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी नवी मुंबईतील अनेक जेष्ठ नागरिक संस्था, संघटना व जेष्ठ महिला वर्गाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.